दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:25 IST2025-10-11T13:23:00+5:302025-10-11T13:25:07+5:30
प्लास्टिक, थर्माकोल आणि रासायनिक रंगांपासून दूर राहून, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भेटवस्तूंची मागणी वाढत आहे.

दिवाळीत गिफ्ट्समध्ये पर्यावरणपूरक भेटवस्तूंना वाढती पसंती
पुणे : दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि आपुलकीची पर्वणी. या सणात लोक एकमेकांना भेटवस्तू देऊन स्नेहाची देवाणघेवाण करतात. मात्र, गेल्या काही वर्षांत “इको-फ्रेंडली” म्हणजेच पर्यावरणपूरक भेटवस्तूंची संकल्पना मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. यामध्ये बीजरोपण किट्स, मातीचे दिवे, हातमागावर विणलेल्या गिफ्ट पिशव्या, नैसर्गिक मेणबत्त्या आणि घरगुती मिठाई सेट्स यांसारख्या पर्यावरणपूरक भेटवस्तूंना मोठी पसंती मिळतेय. प्लास्टिक, थर्माकोल आणि रासायनिक रंगांपासून दूर राहून, निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या भेटवस्तूंची मागणी वाढत आहे.
दिवाळीत चमकदार दिवे आणि आकर्षक गिफ्ट्सची रेलचेल असतेच, पण आता ती हरिततेच्या प्रकाशात उजळावी, असा संदेश पर्यावरणपूरक गिफ्ट्स देत आहेत. या भेटवस्तू केवळ सण साजरा करण्याचे माध्यम नाहीत, तर निसर्गाशी नातं घट्ट करण्याचा हरित संकल्प आहेत.
पर्यावरणपूरक भेटवस्तू तयार करताना “कमी खर्च, अधिक उपयोग आणि शून्य कचरा” हा मंत्र पाळला जातो. कच्चा माल म्हणून नैसर्गिक घटक जसे माती, बांबू, कापूस, ज्यूट, नारळाचे कवच वापरले जातात. उत्पादन प्रक्रियेत वीज, पाणी आणि रासायनिक रंगांचा वापर मर्यादित ठेवला जातो. पॅकिंगसाठी पुनर्वापर करता येणारे साहित्य वापरले जाते, ज्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळला जातो.
पर्यावरणपूरक गिफ्टचे वेगवेगळे प्रकार
१. बीजरोपण किट्स आणि टेराकोटा प्लांटर्स
लहान मातीच्या कुंड्यांमध्ये बिया, रोपे आणि नैसर्गिक खत देण्याची प्रथा शहरी भागातही लोकप्रिय झाली आहे. “गिफ्ट करा झाड, जपा नातं आणि निसर्ग” या संकल्पनेतून अशा गिफ्ट्सना मोठी पसंती मिळते.
२. हाताने बनवलेली मातीची दिवे आणि सुगंधी मेणबत्त्या
प्लास्टिकच्या सजावटीऐवजी मातीचे दिवे आणि नैसर्गिक मेणातून बनवलेल्या सुगंधी मेणबत्त्यांवर भर दिला जातो. नैसर्गिक मेणापासून तयार केलेल्या मेणबत्त्या रासायनिक धूर निर्माण करत नाहीत, त्यामुळे घरात शुद्धता टिकते.
३. कपड्यांपासून बनवलेले रीयुजेबल गिफ्ट पॅक्स
गिफ्ट रॅपिंगसाठी कागदाऐवजी हातमागावर विणलेल्या फॅब्रिक बॅग्ज, ज्यूट पिशव्या किंवा कपड्याचे रुमाल वापरण्याची संकल्पना नवी पण प्रभावी आहे. हे पॅक पुन्हा वापरता येतात आणि कचऱ्याचे प्रमाण कमी होते.
४. हातमागावर तयार केलेले उत्पादन
हस्तकला वस्तू, बांबू आणि नारळाच्या करवंटीपासून बनवलेली भांडी, सजावटी वस्तू, तसेच पुनर्वापर करता येणारे स्टेशनरी सेट्स ही उत्पादने ग्रामीण महिलांना रोजगार देतात आणि स्थानिक अर्थव्यवस्था बळकट करतात.
५. घरगुती बनवलेल्या स्वीट्स आणि स्नॅक्स
बाजारातील रासायनिक गोड पदार्थांऐवजी घरगुती तूप, साखर किंवा गूळ वापरून बनवलेले लाडू, चिवडा, शंकरपाळे, कडबोळे यांसारखे पदार्थ भेटवस्तू म्हणून देण्याचा ट्रेंड वाढतो आहे.
“कोरोना नंतर लोकांचा कल स्थानिक आणि टिकाऊ उत्पादनांकडे वाढला आहे. त्यामुळे आमच्या येथे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरणपूरक वस्तू मिळतात, जे पूर्णपणे नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले असतात. यात वेगवेगळी सुगंधी साबणं, नीमपासून तयार केलेला कंगवा, तेल, पेन, वही अशी विविध उत्पादने उपलब्ध आहेत.” - रोहन जाधव, संस्थापक, विभू प्लॅटफॉर्म