धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 16:26 IST2024-12-31T16:25:27+5:302024-12-31T16:26:57+5:30
जोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, आणि या प्रकरणाचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा

धनंजय मुंडेंकडून कराडला काही निरोप आला का? शरणागती प्रकरणावरून संभाजीराजेंचा हल्लाबोल
पुणे : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार असलेला वाल्मिक कराड हा पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मागील अनेक दिवसांपासून वाल्मीक कराड शरण येणार अशा चर्चा सुरू होत्या. त्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आज अखेर तो हजर झाला आहे. यावरून महाराष्ट्रात चांगलेच रान पेटले आहे. विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत टीका करण्यास सुरुवात केली आहे. संभाजीराजे छत्रपती यांनीसुद्धा कराड शरण आल्याच्या प्रकरणावरून आमदार धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केलाय.
संभाजीराजे म्हणाले, कराडची शरणागती हे सी आय डी चे यश नाही. थोडं फार सरकारवर जो आम्ही दबाव टाकला होता, त्यातून हा मानसिक दबाव वाल्मीक कराड वर आला असेल. २२ दिवस आरोपी बिनधास्तपणे महाराष्ट्रात फिरतो. अक्कलकोट येथे जाऊन दर्शन घेतो, पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल होतो. काल धनंजय मुंडे फडणवीस यांना भेटतात आणि आज वाल्मीक कराड हजर होतो हा संशोधनाचा भाग आहे. वाल्मीक कराड ७ आरोपींचा म्होरक्या आहे, त्याच्या नावाने १४ गुन्हे आहेत आणि तरी सुद्धा बॉडी गार्ड घेऊन फिरतो. वाल्मीक कराड यांच्यावर मोक्का लागणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
माझी मुख्यमंत्री यांना विनंती आहे की, धनंजय मुंडे यांना जर पालकमंत्री पद दिलं तर मुळीच देऊ नका. अजित पवारांना सुद्धा विचारायचे आहे की याविषयी तुम्ही एकदा ही बोलला नाहीत. २२ दिवसांनंतर वाल्मीक कराड ला कसा सरेंडर झाला. वाल्मीक कराडला मोक्का लावल्याशिवाय आम्ही सुद्धा गप्प राहणार नाही. काल मुंडे आणि फडणवीस यांची चर्चा झाली होती आणि आज सरेंडर झाला. धनंजय मुंडे यांच्याकडून वाल्मीक कराडला काही निरोप आला का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा
कुणीही पालकमंत्री पद घ्याव पण देशमुख यांना न्याय द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये. मुख्यमंत्र्यानी पालकमंत्री पद स्वीकारलं तर आम्ही स्वागतच करू. धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे त्यांनी स्वतः म्हटलं पाहिजे की जोपर्यंत हा तपास पूर्ण होत नाही आणि देशमुख यांना न्याय मिळत नाही. तोपर्यंत मी मंत्री पदावर राहणार नाही, मोठ मन करून आणि बीडच्या जनतेला न्याय देण्यासाठी राजीनामा द्यायलाच हवा अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.