हीरकमहोत्सवी ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ; यंदा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 10:21 IST2025-09-16T10:20:33+5:302025-09-16T10:21:58+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उपस्थित राहणार आहेत

हीरकमहोत्सवी ‘पुरुषोत्तम’चा शुक्रवारी पारितोषिक वितरण समारंभ; यंदा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उपस्थित राहणार
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवारी ( दि. १९) सायंकाळी ५ वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत पुरुषोत्तम करंडक पटकाविणारे अण्णासाहेब मगर महाविद्यालय (हडपसर) ‘काही प्रॉब्लेम ये का?’ ही एकांकिका पारितोषिक वितरण समारंभापूर्वी सादर करणार आहे.
यंदा पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत हडपसरच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘काही प्रॉब्लेम ये का?’ एकांकिकेने बाजी मारली आणि करंडकावर आपले नाव कोरले. मात्र, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिकेसाठी असलेल्या जयराम हर्डीकर स्मृतिचिन्हासाठी या वर्षी एकही एकांकिका पात्र ठरलेली नाही. सांघिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक हरी विनायक करंडक वामन आख्यान (मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड) एकांकिकेने पटकावले तर तृतीय पारितोषिक संजीव करंडक ‘आतल्या गाठी’ (सर परशुरामभाऊ महाविद्यालय) या एकांकिकेला जाहीर करण्यात आले.
महाराष्ट्रीय कलोपासकच्या वतीने भरत नाट्य मंदिर येथे शनिवार आणि रविवारी हीरकमहोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या नऊ संघांचे तीन सत्रांत सादरीकरण झाले. स्पर्धेचा निकाल रविवारी रात्री जाहीर करण्यात आला. स्पर्धेसाठी योगेश सोमण, अश्विनी गिरी, प्रदीप वैद्य यांनी परीक्षण केले.