पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 12:38 PM2024-03-31T12:38:41+5:302024-03-31T12:39:42+5:30

बारामतीमध्ये सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार, अशी नणंद-भावजय लढत होणार

Dhumshan of Lok Sabha will start in Pune district Country attention to Baramati | पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष

पुणे जिल्ह्यात सुरू होणार लोकसभेचे धुमशान; बारामतीकडे देशाचे लक्ष

पुणे: जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांतील सत्ताधारी व विरोधी अशा दोघांचेही उमेदवार आता निश्चित झाले आहेत. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार, अशी नणंद-भावजय लढत होणार, हेही शनिवारी निश्चित झाले. या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागणार असून, आता प्रचारापासून उघड व गुप्त, अशी दोन्ही भेटींही लढतीमधील उत्सुकता वाढवणार आहेत.

पुणे, बारामती, मावळ व शिरूर, असे ४ मतदारसंघ जिल्ह्यात आहेत. बारामतीमधील मतदान ७ मे रोजी आहे. अन्य ३ मतदारसंघांतील मतदान १३ मे रोजी आहे. बारामतीमध्ये महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे उमेदवार आहेत तर महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. सुळे या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कन्या आहेत. अजित पवार यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत होणार आहे. त्या दृष्टीने मागील काही दिवसांपासून त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. स्वत: उमेदवार असतानाही बारामतीमध्ये कधी न फिरकणारे शरद पवारही आता तिथे ठाण मांडून बसल्याप्रमाणे राजकीय हालचाली करत आहेत.

त्यांना मात देण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होत आहे. त्यासाठी त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पुरंदर व इंदापूर या तालुक्यांमधील अनुक्रमे विजय शिवतारे व हर्षवर्धन पाटील या दोन माजी मंत्र्यांची मनधरणी करून त्यांना मनवले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यस्थी पणाला लावली. त्यातूनच मग पुरंदरचा तह केला व इंदापूरची नाराजी दूर केली. या दोन तालुक्यांशिवाय खडकवासला मतदारसंघाकडेही त्यांनी खास लक्ष दिले आहे.

शिरूरमधील लढत महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे व महायुतीचे शिवाजीराव आढळराव यांच्यात होईल. उमेदवारीसाठी शिवसेना (एकनाथ शिंदे) सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आढळराव यांचा हा ऐनवेळचा प्रवेश मतदारांच्या किती पचनी पडेल, याकडे आता सर्वांचे लक्ष आहे. डॉ. कोल्हे यांनाही आढळराव यांच्यामागे अजित पवार उभ्या करणार असलेल्या ताकदीकडे लक्ष द्यावे लागेल, असे आजचे चित्र आहे.

मावळमध्ये अखेर महायुतीचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर संजोग वाघेरे यांच्यात लढत होईल. वाघेरे यांनी कंबर कसली असून, यावेळी निवडणूक जिंकायचीच, असा पण केला आहे तर अट्टाहास करून उमेदवारी मागून घेणाऱ्या बारणे यांनीही आपण यंदाही जिंकणारच, असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. ही लढतही रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

पुण्यातील लढतीचे चित्र एकतर्फी असेल, हा अंदाज खोडण्यास महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी आक्रमक प्रचार करत सुरुवात केली आहे. महायुतीचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यामागे त्यांच्या वैयक्तिक संपर्कांबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचे बळ आहे. त्याशिवाय महायुतीमधील शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांचाही त्यांना मोठी मदत होणार आहे. धंगेकर यांनी आपण सामान्यांचे उमेदवार असे मतदारांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न चालवला आहे.

Web Title: Dhumshan of Lok Sabha will start in Pune district Country attention to Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.