Devendra Fadnavis is important as a human noy chief minister : Amruta Fadnavis | मुख्यमंत्री नाही, माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी महत्वाचे 
मुख्यमंत्री नाही, माणूस म्हणून देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी महत्वाचे 

पुणे : देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून माझ्यासाठी महत्वाचे आहेत अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात आपल्या भावना मांडल्या. मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून दोनही बाजूंचा सामना करावा लागतो. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते. इतर लोक काय म्हणतात यापेक्षा आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल काय वाटते हे महत्वाचे आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

पुण्यात आयोजित ग्राव्हीट्स रत्न या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन व सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी गौरी खान प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाला खासदार संजय काकडे, उद्योजक सतीश मगर, आदर पुनावाला, सिम्बायोसिसच्या विद्या येरवडेकर, आमदार माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. यावेळी रजनी परांजपे, रंजना बाजी, वर्षा देशपांडे, वंदना खरे, राहीबाई पोपळे, रितू बियानी, मुक्ता पुणतांबेकर, दिशा शेख, मीरा बडवे, लीना बोकील, कावेरी नागरगोजे, डॉ. विनिता आपटे, प्रिया चोरगे, अंजली पवार, पल्लवी रेनके, मनीषा टोकळे, जयती बरुडा या महिलांना कर्तुत्ववान महिलांना ग्राव्हीट्स रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वीरपत्नी सुषमा संजय राजपूत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.  

फडणवीस म्हणाल्या की, संगीत माझ्यासाठी टेन्शन दूर करण्याचे साधन आहे. जग बदलण्याची ताकद संगीतात आहे. त्यामुळे सामाजिक, मानसिक बदल घडू शकतात. चांगले संगीत परिवर्तन घडवू शकते असा माझा विश्वास आहे.  महिला सक्षमीकरणाबद्दल त्या म्हणाल्या की, महिलांना मोठी दरी भरून काढायची आहे. त्यासाठी समाजसाठी सातत्याने काम करणाऱ्यांची सध्या आवश्यकता आहे. समाजाची मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी अशा कामाची नितांत गरज आहे. महिला सक्षमीकरणासाठी महिलांनीच पुढाकार घेणे महत्वाचे आहे. 

गौरी खान म्हणाल्या की, ''मला पहिल्यापासून डिझायनिंग आवडत होते. अगदी सुरुवातीला मी छोट्या स्वरूपात दुकान सुरू केले. त्यावेळी स्थिरस्थावर होण्यासाठी  खूप प्रयत्न केले. प्रत्येकाने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. प्रत्येक महिलेने मोठी स्वप्ने पाहायला हवीत. आखलेला प्रत्येक प्रकल्प परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रसिद्धी मिळत असताना आपण आहोत तसे आणि जास्तीत जास्त साधेपणाने जगलो तर आयुष्य सुकर होत असते असेही त्या म्हणाल्या.  

प्रास्ताविक करताना उषा काकडे म्हणाल्या की,हजारो शिंपले उघडल्यावर एक मोती सापडतो तशी लाखो शिंपले शोधल्यावर आम्हाला कर्तृत्ववान महिलांच्या रूपातील रत्ने सापडली. त्यांच्यावर आधारित हे कॉफी टेबल बुक आहे. महिलांनी एकमेकींचा आदर करायला हवा असेही त्या म्हणाल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने सूत्रसंचालन केले.     

Web Title: Devendra Fadnavis is important as a human noy chief minister : Amruta Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.