धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 14:15 IST2025-05-03T14:15:15+5:302025-05-03T14:15:50+5:30

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याची मागणी वाढली आहे

Despite sufficient water storage in the dam there is a shortage in Pune city Water supply is closed for 1 day a week on a rotational basis | धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद

धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद

पुणे: महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात १५ जुलैपर्यंत शेतीला व पिण्यासाठी पुरेल इतका ९ टीएमसी पाणीसाठी आहे. असे असताना महापालिकेने शहरात पाणीकपात लागू केली आहे. वडगांव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा हाेणाऱ्या भागांत राेटेशन पद्धतीने आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. यासाठी महापालिकेने वेळापत्रक जाहीर केले आहे. दरम्यान, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरण्याचे पत्र महापालिकेला दिले आहे. मात्र, पाणी कपात करण्याचे कसलेही आदेश दिले नसल्याचे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाने दिले आहे.

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याची मागणी वाढली आहे. त्यातच महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने उपनगरातील नागरिकांची भिस्त टँकरच्या पाण्यावरच आहे. वडगांव जलशुद्धीकरण प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जाणाऱ्या सिंहगड रस्ता, सहकारनगर, धनकवडी, बालाजी नगर, आंबेगाव पठार, दत्तनगर, संताेषनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, काेंढवा बुद्रुक या भागाचा या भागात पाणी पुरवठ्याच्या वारंवार तक्रारी येत असतात. या भागात पाणीटंचाई निर्माण झाल्याचे कारण देत पाणीपुरवठा विभागाने ५ मेपासून राेटेशन पद्धतीने पाणीपुरवठा करण्यासाठी वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.

दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात ९ टीएमसी म्हणजे ३१ टक्के पाणीसाठा आहे. यामध्ये ५ टीएमसी पुण्यासाठी आणि ४ टीएमसी शेतीसाठी आरक्षित आहे. सध्या कालव्यातून उन्हाळी हंगामाचे आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन १ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा शहर व ग्रामीणला १५ जुलैपर्यंत पुरेल ऐवढा आहे. असे असताना महापालिकेकडून पाणी कपात करण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे.

विभागवार दिवस निहाय पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढील प्रमाणे 

साेमवार : बालाजीनगर, गुरुदत्त साेसायटी, पवार हाॅस्पिटल, कात्रज, उत्कर्ष साेसायटी, गुजरवस्ती, कात्रज तलावाचा पूर्व भाग, काेंढवा, साईनगर, शांतीनगर, श्रीकृष्ण काॅलनी इ.

मंगळवार : सनसिटी, जुनी धायरी, माणिक बाग, विठ्ठलवाडी, राजस साेसायटी, कमला सिटी, स्टेट बॅंक साेसायटी, कामठे पाटीलनगर, खडी मशिन चाैक, सिंहगड काॅलेज इ.

बुधवार : हिंगणे, वडगाव बुद्रुक, खराेड वस्ती, संताेष हाॅल मागील भाग, आनंदनगर, वाघजाईनगर, सम्राट टाॅवर, अंबामाता मंदिर परिसर, माऊलीनगर, बलकवडे नगर, सुखसागरनगर भाग २, शिवशंभाेनगर.

गुरुवार : धनकवडी गावठाण, राजमुद्रा साेसायटी, दाैलतनगर, चैतन्यनगर, आदर्शनगर, तळजाई पठार, टिळकनगर, सावरकर साेसायटी, आंबेडकर वसाहत, सहकारनगर भाग १. सुखसागर नगर भाग १, महादेवनगर भाग २, निलया साेसायटी, सावकाशनगर, काकडेवस्ती, गाेकुळनगर.

शुक्रवार : आंबेगाव पठार, दत्तनगर भुयारी मार्ग, त्रिमुर्ती चाैक, भारती विहार साेसायटी, भारती विद्यापीठ मागील भाग, वसवडेनगर, जाधवनगर, भारतनगर, दत्तनगर, काेंढवा बुद्रुक गावठाण, वटेश्वर मंदीर, हिल व्ह्यु साेसायटी, मरळ नगर, ठाेसरनगर इ.

शनिवार : आगम मंदिर, संताेषनगर, जांभुळवाडी रस्ता, वंडर सिटी परिसर, साईनगर, राजीव गांधी वसाहत, चैत्रबन वसाहत, झांबरे वस्ती, अजमेरा पार्क, शिवशक्ती नगर इ.

रविवार : महादेवनगर, आनंदनगर, विद्यानगर, महावीरनगर, पिसाेळी राेड, पारगेनगर, आंबेडकरनगर, हगवणेनगर, पुण्यधाम आश्रम राेड.

जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे पत्र महापालिकेला दिले होते. मात्र, धरणात १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाण्याचा साठा आहे. त्यामुळे सध्या तरी कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्याचे आदेश दिले नाहीत. - श्वेता खुराडे, कार्यकारी अभियंता, खडकवासला विभाग, जलसंपदा विभाग

Web Title: Despite sufficient water storage in the dam there is a shortage in Pune city Water supply is closed for 1 day a week on a rotational basis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.