जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:29:29+5:302021-02-07T04:30:09+5:30

हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका

deputy cm ajit pawar indirectly attacks bjp leader harshvardhan patil | जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही - अजित पवार

जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही - अजित पवार

इंदापूर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीत काहींनी निष्ठा बाजूला ठेवून विरोधकांचे काम केले. अशा जित्राबांना पक्षात पुन्हा प्रवेश नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.

इंदापूर येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार यांनी तुफान टोलेबाजी केली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता टीका करताना ते म्हणाले, जे भाजप शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले आहे अशा राजकीय पक्षात इंदापूरचा एक नेता जातो हे दुर्दैव आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप निवडून येईल, असा बऱ्याच लोकांचा चुकीचा अंदाज होता. म्हणून आजच्या स्टेजवर बसलेल्या लोकांनी वेगळी कामे केली. एक दिलाने काम केले असते तर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असते.

आता आपल्याला नवी टीम तयार करायची आहे. मला पण ३० वर्षे राजकारणात झाली आहेत. त्यावेळी माझ्यासोबत तरुणांची टीम होती. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त निर्व्यसनी राहा. ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर करू नका. टोप्या फिरवू नका. दिलेला शब्द पाळा आणि शब्दाचे पक्के राहा, अशी टोलेबाजीही पवार यांनी केली. त्यांच्या टोलेबाजीला कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली. 

Web Title: deputy cm ajit pawar indirectly attacks bjp leader harshvardhan patil