पुणे महापालिकेची मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्यास उपमुख्यमंत्री अनुकुल; भाजपाचे मनसुबे उधळण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2021 13:01 IST2021-02-06T13:00:49+5:302021-02-06T13:01:06+5:30

राष्ट्रवादी, काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी भाजपावर ऑनलाईन सभेद्वारे चर्चा न करताच ठराविक ‘विषय’ मार्गी लावायचे असल्याचा आरोप केला आहे.

Deputy Chief Minister favors to hold Pune Municipal Corporation's main meeting directly; NCP's game to thwart BJP's intentions | पुणे महापालिकेची मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्यास उपमुख्यमंत्री अनुकुल; भाजपाचे मनसुबे उधळण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

पुणे महापालिकेची मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्यास उपमुख्यमंत्री अनुकुल; भाजपाचे मनसुबे उधळण्यासाठी राष्ट्रवादीची खेळी

ठळक मुद्देभाजपाकडून सोमवारी मुख्यसभा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आदेशानुसार घेतल्या जाणाऱ्या ऑनलाईन मुख्य सभा आता  ‘ऑफलाईन’ अर्थात प्रत्यक्ष होण्याची शक्यता वाढली आहे. प्रत्यक्षात सभा घेण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार अनुकुल असून याबाबत मुख्यमंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोलून याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन पवार यांनी दिल्याची माहिती पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी दिली. 

कोरोनामुळे लागू करण्यात आलेले ‘लॉकडाऊन’ हळूहळू शिथिल करण्यात आले असून दुकानांपासून सिनेमागृहांपर्यंत सर्वकाही सुरु करण्यात आले आहे. त्यातच राज्य आणि केंद्राची अधिवेशनेही झाली आहेत. त्यामुळे पालिकेची मुख्यसभा प्रत्यक्ष घेण्याबाबत सर्व नगरसेवक आग्रही आहेत. मागील काही महिन्यांपासून नगरसेवकांच्या मागणीवरुन महापौरांकडून राज्य शासनाकडे पत्र पाठवित मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्याबाबतची मागणी करण्यात आली होती. परंतु, राज्य शासनाकडून ही परवानगी देण्यात आलेली नाही. 

शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार पुण्यामध्ये आलेले होते. यावेळी पालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी पवार यांच्याकडे पालिकेची मुख्य सभा प्रत्यक्षात घेण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी पालिका आयुक्त विक्रम कुमार हे उपस्थित होते. या मागणीचा सकारात्मक विचार करून पवार यांनी २०० लोकांचा परवानगी सह पालिका सभागृहात प्रत्यक्षात मुख्य सभा घेण्यास परवानगी देण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच, याबाबत मुंबईतील वरिष्ठ अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ असेही आश्वासन दिले असे धुमाळ म्हणाल्या. 
====
भाजपाकडून सोमवारी मुख्यसभा ऑनलाईन घेण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. तर, राष्ट्रवादी, काँग्रेस आदी विरोधी पक्षांनी भाजपावर ऑनलाईन सभेद्वारे चर्चा न करताच ठराविक ‘विषय’ मार्गी लावायचे असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यसभा प्रत्यक्षात घेण्याची परवानगी मिळवून भाजपाचे मनसुबे उधळून लावण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे धुमाळ म्हणाल्या.

Web Title: Deputy Chief Minister favors to hold Pune Municipal Corporation's main meeting directly; NCP's game to thwart BJP's intentions