डॉ. मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 20:31 IST2025-06-26T20:31:02+5:302025-06-26T20:31:39+5:30

- विविध संस्थांकडून निषेध करून पोलिसांना निवेदन, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Demand for action against those defaming Dr. Medha Kulkarni | डॉ. मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

डॉ. मेधा कुलकर्णी यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी

पुणे : रेल्वेस्थानकाच्या नामांतराची मागणी केल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या राज्यसभेतील खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले फलक लावण्यात आले आहेत. शहरात अशा प्रकारचे फलक लावणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र ब्राह्मणसभेच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या घटवाई यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज दिला आहे. डॉ. कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्थानकाचे नाव बदलावे. रेल्वेस्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले फलक शहरात लावण्यात आले आहे. कुलकर्णी यांची बदनामी करणारे फलक लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी घटवाई यांनी आयोगाकडे केली आहे.

लोकप्रतिनिधींची बदनामी केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परशुराम हिंदू सेवा संघाकडून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघाकडून डेक्कन जिमखाना पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांना देण्यात आले आहे. याप्रकरणी अज्ञातांविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक महिला खासदार, तसेच ब्राह्मण समाजातील असल्याने त्यांची बदनामी करण्यात आली आहे. बाजीराव पेशवे, पेशवाई संदर्भात आणि ब्राह्मण समाजाची बदनामी होईल, अशा भाषेत फलक लावण्यात आले आहेत. या वेळी परशुराम हिंदू सेवा संघाचे विश्वजित देशपांडे, आम्ही सारे ब्राह्मण संस्थेचे भालचंद्र कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती केंद्राचे मकरंद माणकीकर, श्रीकांत जोशी, मंदार रेडे, मनोज तारे, ईशानी जोशी उपस्थित होते. 

पोलिस आयुक्तांना अहवाल पाठवण्याच्या सूचना..

मेधा कुलकर्णी यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर असलेले फलक लावल्याप्रकरणी चौकशी करून कार्यवाही करावी. याबाबतचा अहवाल तत्काळ पाठवण्यात यावा, अशी सूचना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिली आहे.

Web Title: Demand for action against those defaming Dr. Medha Kulkarni