Delay in admission to university department | विद्यापीठ विभागातील प्रवेशाला विलंब : प्रवेश प्रक्रियेत त्रुटी
विद्यापीठ विभागातील प्रवेशाला विलंब : प्रवेश प्रक्रियेत त्रुटी

ठळक मुद्देआरक्षण बदल व पुरपरिस्थितीचाही फटका

पुणे: सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठातील विविध विभागांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचे प्रवेश ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून दिले जात आहेत. शासनाकडून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत प्रसिध्द केलेल्या अध्यादेशानुसार विद्यापीठाला प्रवेश प्रक्रियेत ऐनवेळी बदल करावे लागले. तसेच सांगली,कोल्हापूर परिसरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे अनेक विद्यार्थी प्रवेश घेऊ शकले नाहीत. त्याचप्रमाणे प्रवेश प्रक्रियेत काही त्रुटी असल्यामुळे योग्य विद्यार्थी विभागांपर्यंत पोहचू शकले नाही. परिणामी अर्धा ऑगस्ट महिना संपला तरीही अनेक विभागांमध्ये 100 टक्के प्रवेश झाले नसल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठातील विभागांमार्फत दिली जाणारी पारंपरिक प्रवेश पद्धती बंद करून विद्यापीठ प्रशासनाने यंदा सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार विज्ञान शाखेच्या काही विभागांमधील सर्व जागांवर विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.मात्र,कला शाखेच्या काही विभागांमधील प्रवेशासाठी दुसरी प्रवेश यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे या यादीतील विद्यार्थी प्रवेश केव्हा घेणार आणि या विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यास केव्हा सुरूवात होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यापीठाने घेतलेल्या प्रवेश पूर्व परीक्षेत अधिक गुण मिळवणा-या विद्यार्थ्यांची नावे संबंधित विभागाकडे प्रवेशासाठी पाठविली जातात. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली जातात.परंतु, या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र नसल्याचे समोर येते.त्यामुळे काही विभागात प्रवेशाच्या जागा अजूनही रिक्त आहेत.मराठी विभागात केवळ प्रथम वर्ष बीएस्सी पूर्ण केलेला विद्यार्थी पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आला होता.परंतु,कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संबंधित विद्याथ्यार्चा प्रवेश नाकारण्यात आला. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निकषात बदल झाल्यामुळे विद्यापीठाने सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने प्रवेश प्रक्रियेत आवश्यक बदल केले.परंतु,यामुळे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया लांबली. 
विद्यापीठातर्फे राबविली जात असलेली ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पारदर्शी आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हिताची असल्याचे सांगितले जाते.परंतु,या प्रवेश प्रक्रियेत काही त्रुटी आहेत.विद्यापीठाने एकाच वेळी सर्व विभागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया न राबवता टप्प्या-टप्प्याने राबविणे सोयीचे ठरले असते,असे विद्यापीठातील काही प्राध्यापकांकडून सांगितले जात आहे.


Web Title: Delay in admission to university department
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.