काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय

By राजू इनामदार | Updated: April 24, 2025 18:39 IST2025-04-24T18:38:49+5:302025-04-24T18:39:35+5:30

आगामी विधानसभेत हेच उमेदवार असतील, तर मग पक्षासाठी झिजलेल्या इच्छुक उमेदवारांनी करायचे तरी काय, असा प्रश्न विचारला जातोय

Defeated Congress candidates directly join the party Even allies are suspicious of BJP's politics in Pune | काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय

काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश; पुण्यात भाजपच्या राजकारणाचा मित्रपक्षांनाही संशय

पुणे: भारतीय जनता पक्षाच्या राजकारणाचा आता त्यांच्याच शिवसेना (एकनाथ शिंदे) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या मित्रपक्षांना संशय येऊ लागला आहे. या दोन्ही पक्षांचे आमदार असलेल्या विधानसभा मतदारसंघात तेथील काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांना थेट पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यासाठी स्वपक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचाही सामना केला जात आहे.

भोर, वेल्हा, मुळशी विधानसभेतील काँग्रेसचे पराभूत उमेदवार संग्राम थोपटे यांना प्रवेश दिला. थोपटे या मतदारसंघाचे काँग्रेसचे सलग ३ वेळा आमदार होते. त्याआधी त्यांचे वडील अनंतराव थोपटे यांनी सलग ६ वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडणूक जिंकली. अजित पवार यांनी एकत्रित राष्ट्रवादीमध्ये सातत्याने थोपटे यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मात्र त्यांना यश मिळाले. त्यांच्या पक्षाचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी थोपटे यांचा पराभव केला. अजित पवार मित्रपक्षाचे असतानाही भाजपने आता थोपटे यांना आपल्या पक्षात घेतले आहे.

हाच प्रकार आता पुरंदर विधानसभेत करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. तिथे शिवसेना (एकनाथ शिंदे) गटाचे विजय शिवतारे विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय जगताप यांचा पराभव केला. आता माजी आमदार जगताप यांच्या भाजप प्रवेशासाठी भाजपने जाळे लावले असल्याची चर्चा आहे. थोपटे यांच्या प्रवेशावेळीच जिल्ह्यात आणखी एक आमदार भाजपमध्ये येणार आहे, असे सांगून नेत्यांनी या चर्चेला पुष्टीच दिली आहे. थोपटे यांच्याप्रमाणेच जगताप घराण्याचेही पुरंदरवर राजकीय वर्चस्व आहे.

थोपटे यांच्या पक्ष प्रवेशामुळे तिथे वर्षानुवर्षे भाजपचे पदाधिकारी म्हणून त्यांच्याबरोबर राजकीय वैर घेणारे भाजपचे मुळशी तालुका सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी पक्षप्रमुखांकडे जाहीर नाराजी व्यक्त केली. मात्र, या नाराजीला पक्षाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यांच्या म्हणण्याकडे पक्षाने साधे लक्षही दिलेले नाही. पुरंदरमध्येही हीच स्थिती आहे. तेथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वतीने कायम जगताप यांच्या घराण्याच्या विरोधात काम केले. आता त्यांनाच डावलून जगताप यांच्या पक्ष प्रवेशाचा प्रयत्न केला जात आहे.

शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात राजकीय शह देण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. थोपटे यांचा प्रवेश पुढील विधानसभेचे उमेदवार म्हणूनच झाला आहे. जगताप यांनाही तोच शब्द देण्याचा पक्षाचा विचार आहे. आगामी विधानसभेत हेच उमेदवार असतील, तर मग पक्षासाठी झिजलेल्या इच्छुक उमेदवारांनी करायचे तरी काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

Web Title: Defeated Congress candidates directly join the party Even allies are suspicious of BJP's politics in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.