खेडच्या खरपुडी गावातील सरपंच विशाल काशिद यांच्यावर जीवघेणा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 15:02 IST2021-09-17T15:02:32+5:302021-09-17T15:02:44+5:30
चारचाकीची काच फोडून पिस्तुल रोखले मात्र सरपंच काशिद यांनी जोरात चारचाकी चालविल्यामुळे या घटनेतून ते बचावले

खेडच्या खरपुडी गावातील सरपंच विशाल काशिद यांच्यावर जीवघेणा हल्ला
राजगुरुनगर: खेड तालुक्यातील खरपुडी गावाचे सरपंच विशाल अशोक काशिद यांच्यावर अज्ञात इसमानी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. चारचाकीची काच फोडून पिस्तुल रोखले मात्र सरपंच काशिद यांनी जोरात चारचाकी चालविल्यामुळे या घटनेतुन ते बचावले आहे. या घटनेने खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे.याबाबत अज्ञात चार व्यक्ती विरूध्द त्यांनी खेड पोलिस ठाण्यात फीर्याद दिली आहे.
या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, खरपुडीचे सरपंच विशाल काशिद व त्यांचा मित्र हे १६ तारखेला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेलमध्ये जेवण करून घरी जात होते. खेड कनेरसर मार्गावरून ते खरपुडी गावालगत कच्या रस्त्यावरून चारचाकीत घरी जात असताना दोन दुचाकीवरून चार व्यक्तीने येऊन सरपंच काशिद यांच्या चारचाकीला दुचाकी आडव्या लावल्या.
चौघांनी तोंडाला रुमाल बांधले असल्यामुळे सरपंच काशिद यांना ओळखू आले नाही. दरम्यान एकानं लाकडी दांडक्यानं गाडीची काच फोडण्याच्या प्रयत्न केला. तो असफल झाल्यानंतर दगडानं काच फोडली. तुला लई माज आला आहे. तुझा माज जिरवतो असं म्हणून खिश्यातून पिस्तुल काढून सरपंच काशिद यांच्यावर रोखला. प्रसंगधाव पाहून सरपंच चारचाकी जोरात चालवल्यामुळे या घटनेतून बचावले आहे.
या घटनेने खरपुडी परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत सरपंच काशिद यांनी अज्ञात चार जणाविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असुन पोलिस या घटनेचा तपास करित आहे. खरपुडी गावात लाखो रुपायांची कामे विकासकामे सुरू आहेत. हे विरोधाकांना पाहवत नसल्यामुळे राजकीय वैरातुन माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असल्याचे सरपंच काशिद यांनी सांगितले.