पानशेत : राजगड तालुक्यातील वेल्हे खुर्दचे सरपंच प्रकाश जेधे यांच्यावर ४ हल्लेखोरांनी लोखंडी रॉड, कोयता, लाकडी दांडक्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरपंच जेधे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला, छातीला गंभीर दुखापत झाली आहे.
वेल्हे खुर्द येथील जलजीवन मिशनअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाच्या वादातून हा हल्ला करण्यात आला आहे. जेधे यांनी वेल्हे पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी लहू भोरेकर, आकाश भोरेकर, वैभव भोरेकर आणि अमित भोरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत आकाश भोरेकर याला अटक केली आहे. इतर तीन आरोपी अद्याप फरार आहेत. वेल्हे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने गावगुंडांच्या वतीने करण्यात आलेल्या या हल्ल्याच्या निषेधार्थ फरार आरोपींना तत्काळ अटक करावी, गावगुंडांना जरब बसावी यासाठी शुक्रवारी (दि. ९) वेल्हे पोलिस ठाणे, तहसीलदार कार्यालय वेल्हे येथे निषेध मोर्चा काढत सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगाळ, तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन दिले. या वेळी आमदार शंकर मांडेकर यांनी उपस्थित राहात आरोपींना तत्काळ अटक करा असे आदेश पोलिसांना दिले. सरपंच प्रकाश जेधे यांच्यावर झालेला हल्ला निंदनीय आहे. हल्लेखोरांना कठोर कारवाई करावी. गावातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी देखील त्यांनी केली.