मुळा - मुठेत मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस

By श्रीकिशन काळे | Updated: December 30, 2024 14:56 IST2024-12-30T14:55:55+5:302024-12-30T14:56:59+5:30

पुणे महापालिकेकडून दररोज दशलक्ष लिटर सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडल्याने जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाला

Dead fish carcasses in Mula Mutha Pollution Control Board issues notice to Pune Municipal Corporation | मुळा - मुठेत मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस

मुळा - मुठेत मृत माशांचा खच; प्रदूषण नियंत्रण मंडळाची पुणे महापालिकेला नोटीस

पुणे: मुळा-मुठा नदीलगतच्या नाईक बेटजवळ गेल्या आठवड्यात मृत माशांचा खच पडला होता. त्याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पुणे महापालिकेने तेथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यामध्ये प्रदूषणामुळे मासे मृत्य झाल्याचे समोर आल्याने ‘एमपीसीबी’ने पुणे महापालिकेला याविषयी नोटीस बजावली आहे.

पुणे महापालिकेच्या वतीने दररोज सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले जाते. ज्या ठिकाणी मासे मृत झाले त्याच्याशेजारीच एक नायडू एसटीपी प्लांट आहे. तेथील घाण पाण्यामुळेच हे मासे मृत झाले, याबाबतचा अहवाल देखील मिळाला आहे. सर्व प्रकाराबद्दल ‘एमपीसीबी’ने महापालिकेला योग्य त्या दक्षता घ्याव्यात, असे आदेश नोटीशीमध्ये दिले आहेत. पुणे महापालिकेकडून दररोज ९० एमएलडी (दशलक्ष लिटर प्रतिदिन) सांडपाणी प्रक्रिया न करता थेट मुळा आणि मुठा नदीत सोडले जाते. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नदीत सोडल्यामुळे जलप्रदूषण होऊन माशांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी महापालिकेचा नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि नदी परिसराची मंडळाच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली होती. त्या वेळी नदीच्या दोन्ही बाजूंना मृत मासे पहायला मिळाले. नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या नजीक तीन नाल्यांमधून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याचे दिसले. त्यामुळे नदीतील माशांचा मृत्यू झाला. नाल्यातील सांडपाणी काळ्या रंगाचे, दुर्गंधीयुक्त असून, त्याचे पीएच मूल्य ६ ते ७ आहे. याच बरोबर जुना नायडू सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पाडण्यात आला असला, तरी नवीन प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. त्यामुळे सध्या प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीमध्ये जात आहे.

नाईक बेटाजवळ मृत मासे आढळून आले. त्याविषयी पाहणी केली. अहवाल आला आणि आम्ही पुणे महापालिकेला त्यासंदर्भात नोटीस देखील पाठवली आहे. -जयशंकर साळुंखे, विभागीय अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे

Web Title: Dead fish carcasses in Mula Mutha Pollution Control Board issues notice to Pune Municipal Corporation