"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 18:42 IST2025-07-12T18:37:09+5:302025-07-12T18:42:54+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नियम सर्वासाठी एकच आहेत म्हणूत बारामतीकरांना इशारा दिला आहे.

"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक भूमिकेसाठी नेहमीच ओळखले जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ते चांगलेच फटकरताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. मग त्यामध्ये सामान्य माणून असो किंवा अधिकारी अजित पवार हे नियमावर बोट ठेवून शिस्तीचे पालन करण्यास सांगत असतात. असाच अनुभव शनिवारी बारामतीकरांना आला. बारामतीमध्ये वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर बोलत असताना अजित पवार यांनी त्यांना टायरमध्ये घालून फटकावण्यास सांगितलं आहे. माझा नातेवाईक असला तरी त्याच्यावर कारवाई करा असंही अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि बेशिस्त वर्तन करणाऱ्यांना इशारा दिला आहे. नियम मोडणारा माणूस कितीही मोठ्या बापाचा असला तरी मी पोलिसांना त्याला टायरमध्ये घालून झोडायला सांगणार आहे. नियम सर्वांसाठी समान आहेत, असं अजित पवार यांनी म्हटलं. अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी बारामती येथील सावित्री हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना त्यांनी हुल्लडबाजी करणाऱ्यांना कठोर शब्दांत इशारा दिला. यावेळी बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही असंही अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
"कधी कधी काही मोटारसायकलवाले इकडे तिकडे बघतात आणि हळूच ओव्हरटेक करून किंवा रॉंग साईडने दुसरीकडे जाण्याचा प्रयत्न करतात. असा माणूस सापडला तर तो कितीही मोठ्या बापाचा असला तरी त्याला टायरमध्ये घेऊन असा झोडायला सांगणार आहे की त्याला दहा पिढ्या आठवल्या पाहिजेत. अजिबात कोणी नियम मोडू नका. मग तो अजित पवार असो किंवा अजित पवारचा कोणी नातेवाईक असो. सगळ्यांना इथे नियम सारखे आहेत," असं अजित पवार यांनी म्हटलं.
यावेळी अजित पवारांनी शहरातील मोकाट जनावरांवरूनही भाष्य केलं. "काही जण चुका करतात. रस्त्यावर कचरा टाकतात. जनावरे चरायला सोडतात. मी त्यांना सांगतो, ती जनावरे कोंडवाड्यात घाला. ऐकले तर ठीक, नाही तर मी त्यांना बाजार दाखवतो. आता जे मालक लोक आहेत त्यांना निर्वाणीचा इशारा देतोय, ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर मालकांवर केसेस होतील. ज्यांची गाढवं आहेत, जनावरे आहेत, ज्यांच्या गायी इकडे-तिकडे फिरत असतात, त्यांनी ते आपल्या दारात बांधाव्यात. त्यांना काय खायला-प्यायला घालायचे ते घालावे. मी बारामती जी चांगली करतो, ती काय सर्वांना कसेही फिरण्यासाठी नाही," असं अजित पवार म्हणाले.