पुणे: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांची विदर्भातील वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने निक्तीच एका पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली आहे. या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
महायुती सरकारमध्ये वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) यांच्या वाट्याला आले आहे. यानुसार या पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी याआधी ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ यांची निवड केली होती. या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या निवडीची घोषणा केली होती. या निवडीत हसन मुश्रीफ यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु मुश्रीफ यांनी वैयक्तिक कारण देत, या पालकमंत्रीपदाचा निवडीनंतर महिनाभरातच राजीनामा दिला होता. या रिक्त जागेवर भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सन २०२४ मध्ये दत्तात्रेय भरणे हे सलग तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून गेले होते. सन २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी वन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केलेले आहे. शिवाय त्यांनी काही काळ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे.
दरम्यान, भरणे हे सन २०१२ ते २०१४ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. जिल्हा परिषदेवर पहिल्यांदाच निवडणून आलेल्या भरणे यांची २० मार्च २०१२ रोजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. तसेच सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले असून हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी सलग तीन वेळा पराजय केला आहे. ते राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे विश्वासू मंत्री म्हणून ओळखले जातात.