पुण्यात तब्बल १०० कोटी रुपयांची दहीहंडी फुटली!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 12:33 PM2022-08-20T12:33:05+5:302022-08-20T12:33:17+5:30

सेलिब्रिटींना दोन लाखांपुढचे मानधन...

Dahihandi worth Rs 100 crore broke out in Pune Crores of loot for Govid's prize | पुण्यात तब्बल १०० कोटी रुपयांची दहीहंडी फुटली!

पुण्यात तब्बल १०० कोटी रुपयांची दहीहंडी फुटली!

googlenewsNext

पुणे : दोन वर्षांनंतर होणाऱ्या दहीहंडीच्या सणासाठी पुणेपिंपरी-चिंचवड मिळून एका दिवसात अंदाजे किमान १०० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. गोविदांसाठीचे बक्षीस, पाहुण्यांचे मानधन व ध्वनिवर्धक, क्रेन, सजावट अशा विविध प्रकारच्या खर्चाचा अर्थातच यात समावेश आहे. हा उत्सव पुणेकरांनी जल्लोषात साजरा केला.

पुण्यात ९६१ व पिंपरी-चिंचवडमध्ये शेकडो सार्वजनिक मंडळांनी उत्साहात दहीहंडी साजरी केली. रात्री उशिरापर्यंत गोविंदांची पथके हंड्या फोडत रस्त्याने फिरत होती.

लाखोंची बक्षिसे

शहरात अनेक ठिकाणी सार्वजिनक मंडळांनी दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदांच्या पथकासाठी लाख रुपयांच्या पुढचीच बक्षिसे ठेवली होती. तसे फलकही दोन दिवसांपासून शहरात सर्वत्र फडकत होते. त्यातही राजकारणातील पदाधिकाऱ्यांच्या मंडळांच्या, राजकारणात पदार्पण करू इच्छिणाऱ्यांच्या निवडक सार्वजनिक मंडळाच्या दहीहंड्यांना पाच लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे होती. अगदी लहान मंडळांनाही किमान ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस होतेच.

पुण्यात दहीहंडीत ९६१ अधिकृत मंडळे

पुणे शहर परिसरात ९६१ मंडळे या दहीहंडीमध्ये सहभागी झाली होती. त्यात मंडई, बाबू गेनू, सुवर्णयुग अशा मोठ्या मंडळांबरोबरच उपनगरांमधील लहानमोठ्या मंडळांचाही समावेश आहे.

सेलिब्रिटींना दोन लाखांपुढचे मानधन

जवळपास प्रत्येक मंडळात सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री, अभिनेता प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होताच. असा एक पाहुणा फक्त उपस्थितीसाठी म्हणून किमान दोन लाख रुपयांच्या पुढची रक्कम घेतो. ती आधीच द्यावी लागते. ही रक्कम दिल्यानंतरही त्या पाहुण्याच्या येण्याजाण्याची, त्याच्या आरामाची व्यवस्था स्वतंत्रपणे करावी लागते व त्यासाठीही किमान ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो.

ध्वनिवर्धक २ ते ४ लाख रुपयांचे

दणदणाटी गाण्यांशिवाय उत्साहाला मजा नाही. ध्वनिवर्धकांची भिंतच प्रत्येक मंडळाजवळ उभ्या करण्यात आल्या होत्या. अशी एक भिंत उभी करायची तर त्यासाठी किमान दोन लाख रुपयांचा खर्च येतो. अत्याधुनिक व वेगवेगळ्या नावांची अशी ही साउंड सिस्टिम असते. ती सुरू झाली की परिसरातील घरांची तावदानेही थरथरून जणू नाचू लागतात. अशी आवाजाशिवाय उत्सवच नाही. त्यामुळे प्रत्येक मंडळाजवळ ध्वनिवर्धक होतेच.

प्रत्यक्ष हंडी

रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या इमारतींना दोरी बांधून मध्यभागी हंडी बांधण्याचे दिवस संपले. आता क्रेन असते. तिचे भाडे तासावर असते. त्याचा खर्च किमान लाख रुपये येतोच. त्याशिवाय क्रेनला लावलेल्या हंडीला झगमगत्या झिरमळ्या, चमचमते हार, त्यावर दिव्यांचे फोकस अशी आकर्षक सजावट करावी लागते. या सजावटीसाठीही किमान एक लाख रुपयांचा खर्च होतोच.

Web Title: Dahihandi worth Rs 100 crore broke out in Pune Crores of loot for Govid's prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.