गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी; संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:20 IST2021-03-27T15:35:15+5:302021-03-27T16:20:54+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश नाही

गणेश भक्तांसाठी महत्वाची बातमी; संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती मंदिर राहणार बंद
महाराष्ट्रासह पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून संकष्टी चतुर्थीला (बुधवार दि. ३१ मार्च) दगडूशेठ गणपती मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील. तरी गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले आहे.
दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अंगारकी संकष्टी चतुर्थीला बाप्पाचे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. गर्दी होऊ नये म्हणूनच हि खबरदारी घेण्यात आली होती. त्याचप्रमाणे येत्या चतुर्थीला बुधवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com/fasttrack यावर नोंदणी करावी.
भक्तांकरीता घरबसल्या दर्शनाची सोय देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.