पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 10:36 IST2025-03-05T10:31:47+5:302025-03-05T10:36:08+5:30
बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे, खाते अपडेट न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी करून पुणेकरांची फसवणूक केली जात आहे

पुण्यात सायबर फसवणूक थांबेना; शहरात ३ ठिकाणी घडला गुन्हा, लाखोंची होतीये लूट
पुणे : शहरात सायबर फसवणुकीचे सत्र सुरूच असून, बँक खातेदाराची माहिती अद्ययावत करण्याची बतावणी तसेच शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणुकीच्या तीन घटना घडल्याचे समोर आले आहे.
बँक खातेदाराची माहिती अद्ययावत करण्याची बतावणी करून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची तीन लाख रुपयांची फसवणूक केली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कर्वेनगर भागातील शाहू काॅलनीत राहायला आहेत. ते सेवानिवृत्त आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी केली. बँक खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे, खाते अपडेट न केल्यास बंद पडेल, अशी बतावणी करत खात्याची गोपनीय माहिती घेतली. त्याचा गैरवापर करून चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या खात्यातून दोन लाख ९८ हजार ९९८ रुपये ऑनलाइन पद्धतीने खात्यात हस्तांतरित केले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वनाथ काईंगडे तपास करीत आहेत.
दुसरी घटना विश्रांतवाडी भागात घडली. शेअर ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याच्या आमिषाने नोकरदार महिलेची ६ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. तर तिसरी घटना विमानतळ भागात घडली. यात १७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.