राज्यात भाताच्या अवघ्या ३४ टक्क्यांवर पेरण्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 01:32 PM2019-07-24T13:32:57+5:302019-07-24T13:34:57+5:30

राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो.

cultivation only 34 percent of the rice in the state | राज्यात भाताच्या अवघ्या ३४ टक्क्यांवर पेरण्या

राज्यात भाताच्या अवघ्या ३४ टक्क्यांवर पेरण्या

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे-नाशिक विभाग मागे : तूर, मूग, उडीद पिकाचे क्षेत्र घटणार

पुणे : राज्यातील १०९ लाख ८२ हजार हेक्टरवरील पेरण्या झाल्या असल्या तरी भात क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने भाताच्या अवघ्या ३४ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीचा टक्का सरासरीच्या जवळ पोहचला आहे. पावसाअभावी तूर, मूग आणि उडीद पिकाच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज आहे. 
राज्यात १ ते २२ जुलै या कालावधीत सरासरी ५०९ मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ३८६.६० (७५.३६ टक्के) इतका झाला आहे. वर्ध्यामधे सरासरीच्या पन्नास टक्के देखील पाऊस झालेला नाही. ठाणे, पालघर, अहमदनगर, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यात सरासरीपेक्षा शंभरटक्के पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, जालना आणि बुलढाणा येथे सरासरीच्या ७५ ते शंभर टक्के पावसाची नोंद झाली असून, उर्वरीत १९ जिल्ह्यांमधे सरासरीच्या ५० ते ७५ टक्के पर्जन्यमान झाले आहे. 
राज्यात ऊस पीक वगळून खरीपाचे क्षेत्र १४०.६९ लाख हेक्टर असून, पैकी १०९.८२ लाख हेक्टरवर(७८.०७टक्के) पेरणी झाली आहे. ऊस पिकासह १४९.७४ लाख हेक्टर क्षेत्र असून, ११०.३६ लाख हेक्टरवर (७३.७० टक्के) पेरणी आणि लागवडीची कामे झाली आहेत. कोकण विभागात ३६,३५५ आणि पुणे विभागात ४,९२९ हेक्टरवरील भात रोप वाटिकेची कामे झाली आहेत. कोकण विभागात भाताचे सरासरी क्षेत्र ३ लाख ९२ हजार ३९२ हेक्टर असून, पैकी २ लाख २९ हजार ६९० हेक्टरवर (५९ टक्के) पेरणी झाली आहे. 
कोल्हापूर विभागात भाताचे १ लाख ७८ हजार ७३१ हेक्टर क्षेत्र असून पैकी १ लाख ३६ हजार ५४७ (७६ टक्के) आणि पुणे विभागात ८० हजार ९०२ हेक्टरपैकी ३२ हजार ४० (४० टक्के) हेक्टरवर भात लावणी झाली. नाशिक विभागात ९६ हजार ३६१ हेक्टरपैकी २६ हजार १७१ (२७.२ टक्के) हेक्टरवर लागवडीची कामे झाली आहेत. राज्याचे भाताचे सरासरी क्षेत्र १५ लाख ८ हजार २२१ हेक्टर पैकी ५ लाख ११ हजार ८०८ हेक्टरवर (३४ टक्के) भात लागवडीची कामे उरकली आहेत. 
सोयाबीनचे क्षेत्र ३५ लाख ५३ हजार ३३४ हेक्टर असून पैकी ३३ लाख ३ हजार ४७३ (९३ टक्के) आणि कापसाचे ४१ लाख ९१ हजार १४४ हेक्टरपैकी ४० लाख ६३ हजार ५५ हेक्टरवरील (९६.९४ टक्के) कामे पूर्ण झाली आहेत. 

Web Title: cultivation only 34 percent of the rice in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.