पुण्यातील कोंढव्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ! तलवारीसह माजवली दहशत, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 11:59 IST2021-06-09T11:59:38+5:302021-06-09T11:59:45+5:30

दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली, नागरिकांनीच घेतली तलवार हिसकावून

Crowd of criminals in Pune's Kondhwa! Terror spread with swords, but ignored by the police | पुण्यातील कोंढव्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ! तलवारीसह माजवली दहशत, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

पुण्यातील कोंढव्यात गुन्हेगारांचा धुमाकूळ! तलवारीसह माजवली दहशत, पोलिसांचे मात्र दुर्लक्ष

ठळक मुद्देअशरफनगर भागात जाऊन रस्त्यावर उभे असणार्‍या ४ ते ५ जणांना त्यांच्याकडील कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला

पुणे: कोंढव्यात अशरफनगर भागात गुन्हेगारांच्या टोळीने रस्त्यात तलवारी नाचत दुकानदारांना जबरदस्तीने दुकाने बंद करायला लावली. परिसरात  दहशत निर्माण करून एकावर वारही केले. तसेच हॉस्पिटलची काच फोडून नुकसान केले. या घटनेनंतर मंगळवारी भर दुपारी पुन्हा अशरफनगर भागात हे गुंड धुमाकूळ घालत असताना नागरिकांनीच शेवटी पुढे होऊन या गुंडांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून तलवार हिसकावून घेऊन ती पोलिसांच्या ताब्यात दिली.

कोंढवा पोलिसांनी शहबाज ऊर्फ लंबु खान (वय २४, रा. अशरफनगर), अरबज खान (वय ३०, रा. अशरफनगर) व त्यांच्या इतर ५ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉ. ओबेदउल्ला अब्दुलरहिम खान (वय ३३, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.

डॉ. खान यांचे अशरफनगर येथे शिफा पॉली क्लिनिक नावाचे हॉस्पिटल आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजता  दोघे जण अचानकपणे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी तेथे बसलेल्या २ महिला रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचे शटर लावून घ्या अशी दमबाजी करु लागले. त्यांच्या ओरडण्याच्या आवाजाने खान बाहेर आले. त्यांनाही ते शटर बळजबरीने लावून घेण्याबाबत सांगू लागले. परंतु, त्यांनी विरोध केल्यावर हॉस्पिटलच्या काचेवर तलवार मारुन काच फोडली. तेथून ते निघून गेले. त्यानंतर हे टोळके एका मेडिकल स्टोअर्सवर जाऊन मेडिकलचे शटर खाली घ्यायचे.

मेडिकलमधून त्यांना पाहिजे ते औषध फुकट द्यावयाचे. नाही दिले तर मारहाण करण्याची व मेडिकल स्टोअर्सची तोडफोड करण्याची धमकी दिली. बाहेर जाऊन त्यांनी हवेत तलवारी फिरवून मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करुन या भागातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करायला लावली. अशरफनगर गल्ली नं. १२ मध्ये जाऊन तेथे रस्त्यावर उभे असणार्‍या ४ ते ५ जणांना त्यांच्याकडील कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना पाहून ते पळून गेले. त्यावेळी या ठिकाणी भाजी विक्रेते सलिम शेख यांची भाजीची गाडी पलटी केली. चहा विक्री करणार्‍या महिलेला जबरदस्तीने चहा विक्री बंद करण्यास सांगितले. गुफरान अन्सारी यांचे किराणा दुकान बंद करुन त्याला कोयत्याने मारहाण करुन जखमी केले. 
तोडफोड करणार्‍यांच्या दहशतीमुळे खान यांनी सोमवारी रात्री तक्रार दिली नव्हती. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता खान तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात जात असताना हे दोन्ही गुंड त्यांच्या हॉस्पिटलच्या परिसरात तलवारी घेऊन हवेत फिरवून, मोठमोठ्याने शिवीगाळ व आरडाओरडा करुन सर्व दुकानदारांना हप्ते द्या नाहीतर दुकान बळजबरीने बंद करायला भाग पाडत होते. त्यावेळी लोकांनी त्यांना पकडून त्यांच्याकडील तलवार जबरदस्तीने हिसकावून घेतली. तेव्हा आमच्याविरुद्ध कोणी तक्रार दिली तर मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. नागरिकांनी ही तलवार कोंढवा पोलिसांकडे जमा केली आहे. त्यानंतर कोंढवा पोलिसांना जाग आली व त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात सर्वत्र लॉकडाऊन सुरु असताना कोंढव्यात मात्र सर्व राजरोसपणे सुरु होते. त्यामुळे रात्री अपरात्री गुंड टोळक्याने फिरुन लोकांवर दहशत पसरवित असल्याचे दिसून आले.

Web Title: Crowd of criminals in Pune's Kondhwa! Terror spread with swords, but ignored by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.