पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गुन्हेगारांची बर्थडे पार्टी; पोलिसांचा धाक राहिला नाही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:06 IST2025-08-06T13:03:21+5:302025-08-06T13:06:55+5:30
गुन्हेगारांवर बचत ठेवण्यासाठी पोलीस का कमी पडताहेत? की गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव येतो? अनेक सवाल उपस्थित

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गुन्हेगारांची बर्थडे पार्टी; पोलिसांचा धाक राहिला नाही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे: पुण्यातील विमाननगर परिसरात एका पबच्या पार्किंगमध्ये कथित गुन्हेगारांची बर्थडे पार्टी मोठ्या थाटात झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना कथित गुन्हेगारांनी अशाप्रकारे बर्थडे पार्टी करणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान निर्माण करणारं आहे. शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील एका पबच्या पार्किंग मध्ये काही कथित भाई लोकांनी एकत्र येत बर्थडे पार्टी साजरी करत गोंधळ घातल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे.
एका पार्किंगचा मोठा परिसर दिसत आहे. त्यात या कथित गुन्हेगारांची टोळी, आणि त्यांना पाठिंबा देणारे पाच पन्नास टाळकी दिसताहेत, ही पार्टी फिरोज शेख याने आयोजित केली होती. जो विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते.आणि ज्या चौकातील पबमध्ये ही पार्टी झाली. त्याच परिसरात त्याने याआधी पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी केली होती. या पार्टीत मोक्कातील आरोपी असलेला गुन्हेगार आकाश कंचिलेदेखील त्याच्या टोळीसमवेत उपस्थित होता. ही पार्टी त्याच टोळीचा म्होरक्या निखिल कांबळे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आली होती. निखिल कांबळेवर येरवडा पोलिस ठाण्यात पोलिसांच्या कस्टडीतून पळून जाण्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातून काही दिवसांपूर्वीच तो येरवडा जेलमधून सुटून आला आहे.
या डीजे पार्टीमुळे विमाननगर परिसरात प्रचंड चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना कथित गुन्हेगारांनी ही पार्टी केली आहे. याचा अर्थ पोलिसांचा कुठल्याच प्रकारचा धाक गुंडांना राहिलेला नाही हे स्पष्ट होत आहे. पोलिसांचा धाक न राहण्याला पोलीसच जबाबदार आहेत का? याचा विचार आता पॉलिसी खात्यानेच करायला हवा, गुन्हेगारांवर बचत ठेवण्यासाठी पोलीस का कमी पडताहेत? की गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव येतो? या सगळ्या गोष्टींचा तपास होणं आता गरजेचं आहे, त्यामुळे पोलिस या प्रकरणात कारवाई करतील का? गुन्हा दाखल केला जाईल का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.