Video : "कॅप्टन खरात माझ्यामुळेच तुरुंगात.."; चाकणकरांसोबत सेटलमेंट केल्याच्या आरोपानंतर तृप्ती देसाई आक्रमक
By किरण शिंदे | Updated: March 22, 2026 16:11 IST2026-03-22T16:10:53+5:302026-03-22T16:11:16+5:30
या प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरे यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप केला होता. मात्र, या सर्व आरोपांना देसाईंनी ठामपणे फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Video : "कॅप्टन खरात माझ्यामुळेच तुरुंगात.."; चाकणकरांसोबत सेटलमेंट केल्याच्या आरोपानंतर तृप्ती देसाई आक्रमक
पुणे - नाशिक परिसरात चर्चेत असलेल्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांच्यावर झालेल्या ‘सेटलमेंट’च्या आरोपांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात रुपाली पाटील ठोंबरे यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक व्यवहाराचा गंभीर आरोप केला होता. मात्र, या सर्व आरोपांना देसाईंनी ठामपणे फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
लोकमतशी संवाद साधताना देसाईंनी सांगितले की, कॅप्टन अशोक खरात यांच्याविरोधातील महत्त्वाचे पुरावे (पेनड्राईव्ह) काही माध्यमांतून त्यांच्या पर्यंत पोहोचले होते. या पुराव्यांमध्ये महिलांवरील अत्याचारांचे कथित व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केला. देसाईंनी स्पष्ट केले की, हे प्रकरण थेट माध्यमांसमोर आणण्याऐवजी त्यांनी आरोपी पळून जाऊ नये म्हणून थेट पोलिसांकडे पुरावे सुपूर्द केले. जर मी पत्रकार परिषद घेतली असती, तर आरोपी देशाबाहेर पळून गेला असता. त्यामुळे मी थेट वरिष्ठ यंत्रणांकडे पुरावे दिले, असेही त्या म्हणाल्या.
तसेच, हे पुरावे अहमदनगर जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडे पाठवण्यात आले होते. त्यानंतर हे प्रकरण राज्याच्या उच्च पातळीपर्यंत पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर नाशिक पोलिसांनी तातडीने कारवाई करत अशोक खरात यांना अटक केल्याचा दावा देसाईंनी केला. ‘सेटलमेंट’च्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देसाईंनी हे आरोप “पूर्णपणे हास्यास्पद आणि दिशाभूल करणारे” असल्याचे म्हटले. कोणतीही आर्थिक देवाणघेवाण झालेली नाही. उलट, महिलांना न्याय मिळावा यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या प्रकरणात अल्पवयीन मुलींसह काही राजकीय व शासकीय महिलांचा सहभाग असल्याचे दावे समोर येत आहेत. त्यामुळे प्रकरण अधिकच संवेदनशील झाले असून तपास यंत्रणा सर्व बाजूंनी चौकशी करत आहे. येत्या काही दिवसांत मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.