Corona virus : इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 16:17 IST2020-05-22T16:16:37+5:302020-05-22T16:17:15+5:30
हे दोन्हीही रुग्ण मुंबईवरुन इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या मुळ गावी परतले.

Corona virus : इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण
इंदापूर (बिजवडी) : इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यात एका ४२ वर्षे महिलेचा तर २२ वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. हे दोन्हीही रुग्ण मुंबई वरुन इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या मुळ गावी परतले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
भिगवण परिसरातील एका महिलेला दि.२८ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती .त्यानंतर काही तासातच तिचा मृत्युही झाला. त्यानंतर दि.१६ मे रोजी मुंबई येथून इंदापूर तालुक्यातील शिरसोडी येथे परतलेल्या दोन मायलेकींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर इंदापूर जवळील डॉ .कदम गुरुकुल येथे उपचार सुरु आहेत.त्यातच आता पोंदकुलवाडी येथे आणखी दोन रुग्ण आढळून आले. सध्या इंदापूर तालुक्यात मुंबई - पुणे अशा हाँटस्पॉट मधून जवळपास अठरा हजारांहुन अधिक नागरिक स्तलांतरित झाले आहेत. शिरसोडी येथील दोन रुग्णांच्या नंतर केवळ सातच दिवसात आणखी दोन रुग्णांची भर पडल्याने इंदापूरकरांची चिंता अधिकच वाढली आहे. हे दोन्हीही रुग्ण पोंदकूलवाडीत त्यांच्या घरीच क्वारंटाईन होते. मात्र त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आता त्यांच्यावर डॉ कदम गुरुकूल येथे उपचार केले जाणार असल्याची माहीती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिली.
सध्या हे रुग्ण कोणाच्या संपर्कात आलेत का? किंवा यांच्या प्रवासाबाबत सखोल माहिती इंदापूर प्रशासनाकडून प्राप्त करण्याचे काम चालू आहे. शिवाय पोंदकुलवाडी चा तीन किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे.
———————————