corona virus : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत मार्केटयार्ड सुरू ठेवणे अशक्य; वेळमर्यादा वाढवून मिळावी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 19:27 IST2020-07-17T19:25:54+5:302020-07-17T19:27:40+5:30
शहरातील लॉकडाऊनचे निर्बंध रविवारपासून काही प्रमाणात शिथील करण्यात येणार

corona virus : प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत मार्केटयार्ड सुरू ठेवणे अशक्य; वेळमर्यादा वाढवून मिळावी
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील लॉकडाऊनमध्ये रविवार (दि. १९) पासून काही प्रमाणात शिथील करण्यात येणार आहे. या रविवारपासून काही व्यवहार सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे. परंतु प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत मार्केटयार्डातील भुसार, भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा, फुले आदी विभाग सुरू ठेवणे अशक्य होणार आहे. त्यामुळे मार्केटयार्डातील व्यवहारासाठी वेळ मर्यादा वाढवून मिळावी. किंवा बाजार सुरू ठेवण्यासाठी मार्गदर्शन मिळावे अशी मागणी करणारे पत्र बाजार समितीच्या प्रशासनाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त यांना शुक्रवारी पाठविले आहे.
फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, फुले विभागात रात्रीपासून पहाटेपर्यंत शेत मालाच्या गाड्या येतात. त्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू होतात. गुळ-भुसार विभागाची परिस्थिती अशीच आहे. त्यामुळे प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व्यवहार करणे अशक्य आहे. गुळ-भुसार, कांदा-बटाटा, फळे, फुले आणि भाजीपाला विभागातील व्यवहारासाठी मागील लॉकडाऊनमध्ये जो कालावधी ठरला होता. तोच कालावधी या वेळीही असावा. असे बाजार समितीने पाठविलेल्या पत्रामध्ये स्पष्ट केले आहे.
लॉकडाऊनमुळे मंगळवारपासून संपूर्ण शहर कडकडीत बंद आहे. पहिल्या लॉकडाऊनच्या चारही टप्यात गुळ-भुसार विभाग सुरू होता. तर फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी आणि फुल विभाग काही दिवसांचा अपवाद वगळता बंदच होते. मात्र या लॉकडाऊनमध्ये मार्केटयाडार्तील सर्वच विभागातील व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनुसार मार्केटयाडार्तील विभाग सुरू होऊ शकतात.
वेळेबाबत मार्गदर्शन हवे, प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळच्या मयार्देत बाजार सुरू करणे सर्व घटकांसाठी अशक्य आहे. त्यामुळे मागील लॉकडाऊनमध्ये जी वेळ ठरली होती. त्याच वेळेत बाजार सुरू ठेवण्याची परवानगी मिळावी. किंवा बाजार कशा पद्धतीने सुरू ठेवता येईल याबाबत मार्गदर्शन मिळावे. असे पत्र जिल्हाधिकारी तसेच महापालिका आयुक्तांना पाठविण्यात आले आहे. त्यांच्या सुचना आणि मार्गदर्शनानुसारच बाजार सुरू होईल असे बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी सांगितले.