Corona virus Pune : पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या वर; अजित पवार निर्बंधांबाबत कडक निर्णय घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 19:41 IST2021-06-24T19:39:09+5:302021-06-24T19:41:39+5:30
गुरुवारीही नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे कमी आढळून आले आहे .

Corona virus Pune : पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या वर; अजित पवार निर्बंधांबाबत कडक निर्णय घेणार?
पुणे : पुणे शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत काही दिवसांपासून सातत्यपूर्ण घट झालेली पाहायला मिळत होती. त्यात पॉझिटिव्हीटी रेट देखील पाच टक्क्यांच्या खाली आला होता. यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्यानंतर पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रेट ५ टक्क्यांच्या पुढे गेला असून आजचा दर ५.८४ इतका आला आहे. यामुळे दर आठवड्याच्या कोरोना आढावा बैठकीत शहरातील निर्बंध आहे तसेच राहणार की कडक करणार याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री नेमका काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेले आहे.
पुणे शहरात गुरुवारी ३३३ कोरोनाबाधित आढळून आले असून १८७ कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ५१६ सक्रिय रुग्ण आहेत. आजही नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांचे कमी आढळून आले आहे. गेल्या तीन महिन्यात असे दुसऱ्यांदा घडले असून सातत्याने कमी होणारी सक्रिय रूग्णसंख्याही वाढली आहे.
आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ६९६ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ५.८४ टक्के इतकी आहे. आज १३ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ३२३इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४६१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख ३४ हजार ७९५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७६ हजार ८२६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६५ हजार ७५६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५५४ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------