Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी ७६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ३९१ जणांची कोरोनावर मात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2021 20:13 IST2021-02-25T20:13:14+5:302021-02-25T20:13:23+5:30
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.

Corona Virus News : पुणे शहरात गुरूवारी ७६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ; ३९१ जणांची कोरोनावर मात
पुणे : शहरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत या आठवड्यात नित्याने वाढ होत असून, गुरूवारीही नवे ७६६ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध प्रयोगशाळांमध्ये ६ हजार ५५६ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची ही टक्केवारी ११.६८ टक्के इतकी आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यामध्ये सर्वाधिक वाढ उपनगरांमध्येच असून, शहराच्या मध्यवर्ती भागातील वाढ मात्र उपनगराच्या तुलनेने खूपच कमी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी सहावाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या ४२८ इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २३१ इतकी आहे. तर आज दिवसभरात ३९१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ३ हजार ९३० इतकी झाली आहे.
शहरात आजपर्यंत ११ लाख २१ हजार २२४ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ४६२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९१ हजार ६९१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ३ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८४१ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------------------------