Corona virus : पुणे महापालिकेच्या 'वॉर रूम'मध्ये दिवसाला २०० पेक्षा अधिक कॉल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 21:37 IST2020-09-23T21:31:20+5:302020-09-23T21:37:42+5:30
ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटांची मागणी असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक

Corona virus : पुणे महापालिकेच्या 'वॉर रूम'मध्ये दिवसाला २०० पेक्षा अधिक कॉल
पुणे : कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या तुलनेत खाटा उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी आहे. अनेकदा रुग्णांना आवश्यक असलेल्या खाटा उपलब्ध होत नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. एकूणच कोरोनावरील उपचार आणि खाटांची उपलब्धता याची माहिती नागरिकांना मिळावी यासाठी पालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनवर दिवसाला २०० पेक्षा अधिक फोन येत असून ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट झाले आहे.
शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा १ लाख ३० हजारांच्या पुढे गेला आहे. आजमितीस साडेसतरा हजार सक्रिय प्रत्यक्ष उपचार घेत असून यातील जवळपास निम्मे रुग्ण गृह विलगिकरणात आहेत. दिवसाला दोन हजार रूग्णांची वाढ होत आहे. यातील ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या खाटांची मागणी असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व स्थितीमध्ये नातेवाईकांची विविध रुग्णालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. या रुग्णालयातून त्या रुग्णालयात रुग्णाला घेऊन जावे लागते. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या उपचारांसाठी आकारलेल्या बिलावरूनही वाद उद्भवतात.
अनेकदा रुग्णालयांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जातात. नागरिकांच्या या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता पालिकेने हेल्पलाईन सुरू केलेली आहे. या हेल्पलाईनद्वारे नागरिकांना आवश्यक माहिती दिली जात असून उपलब्ध खाटांची माहिती दिली जात आहे. रुग्णांच्या आवश्यकतेनुसार त्यांना ऑक्सिजन अथवा व्हेंटिलेटरच्या खाटा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दिवसाला २०० पेक्षा अधिक कॉल याठिकाणी येत आहेत. हेच प्रमाण ऑगस्टमध्ये दिवसाला १०० असे होते. २३ जुलै रोजी सुरू झालेल्या या सुविधेद्वारे पुणेकर नागरिकांना मदत मिळत आहे.
-----
'वॉर रूम'कडे आलेल्या कॉलचा तपशील
महिना साध्या खाटा ऑक्सिजन व्हेंटिलेटर आयसीयू रुग्णवाहिका एकूण कॉल
जुलै ३८७ १९१ ८४ ३४ ०६ ७०२
ऑगस्ट १,०३६ ६९२ ३८१ १८९ २९ २,३२७
सप्टेंबर १,१२९ १,६६० ६०८ २०९ ०७ ३,६१३
एकूण २,५५२ २,५४३ १,०७३ ४३२ ४२ ६,६४२