Corona Virus : पिंपरी-चिंंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 00:45 IST2020-08-31T00:39:59+5:302020-08-31T00:45:02+5:30
चाकण वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या संतोष झेंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता...

Corona Virus : पिंपरी-चिंंचवड शहर पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी
पिंपरी : लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलात एकाही पोलिसाला कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला नव्हता. १५ मे रोजी शहर पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला. शहर पोलिसांच्या वाहतूक शाखेच्या चाकण वाहतूक विभागात कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष झेंडे यांचे कोरोनामुळे रविवारी (दि. ३०) निधन झाले. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील कोरोनामुळे झालेला हा पहिला मृत्यू आहे.
संतोष झेंडे यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूंचा संसर्ग झाला होता. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
संतोष झेंडे सुरुवातीला मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी पुणे शहर, पुणे वाहतूक विभाग, पिंपरी, एमआयडीसी भोसरी येथे सेवा बजावली. शहर पोलीस दलातील ३२ अधिकारी आणि २२२० पोलीस कर्मचारी कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या नऊ अधिकारी व ६० कर्मचारी उपचार घेत आहेत. तसेच बाहेरून पिंपरी-चिंचवड शहरात बंदोबस्तासाठी आलेले १० कर्मचारी देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून कोरोना सेल कार्यान्वित करण्यात आला आहे. या सेलकडून कोरोना पॉझिटिव्ह पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यात येते. त्यामुळे पूर्वीच्या गंभीर व्याधी व आजार असलेल्या पोलिसांनी कोरोनावर सहज मात केल्याचे दिसून येते. मात्र, झेंडे यांच्या मृत्यूमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.