Corona virus : पुणे शहरात कोरोना रूग्णांनी ओलांडला साडे चार हजारांचा टप्पा; शनिवारी २०५ नवीन रुग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 21:02 IST2020-05-23T20:58:18+5:302020-05-23T21:02:37+5:30
दिवसभरात ९२ रुग्ण घरी : तब्बल १७० रुग्ण अत्यवस्थ तर सात रूग्णांचा मृत्यू

Corona virus : पुणे शहरात कोरोना रूग्णांनी ओलांडला साडे चार हजारांचा टप्पा; शनिवारी २०५ नवीन रुग्णांची वाढ
पुणे : कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा शनिवारी २०५ ने वाढला असून शहरातील आकडा साडेचार हजाराच्या पलीकडे गेला आहे. एकूण रुग्णसंख्या ४ हजार ६०३ झाली आहे. बरे झालेल्या ९२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण १ हजार ८९२ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७० रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
शनिवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २०५ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १६५ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२८ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनिवारी ०७ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २४८ झाली आहे.
दिवसभरात एकूण ९२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ६७ रुग्ण, ससूनमधील ०१ तर खासगी रुग्णालयांमधील २४ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ४६३ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ८९२ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १७२३ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४० हजार ४९३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १२२४, ससून रुग्णालयात १५६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५१२ रुग्ण उपचार घेत आहेत.