Video : पुण्यात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून वादाची ठिणगी; काही विद्यार्थी संघटनांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 12:46 IST2026-02-20T12:45:50+5:302026-02-20T12:46:51+5:30
काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविल्यामुळे विद्यापीठ परिसरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Video : पुण्यात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानावरून वादाची ठिणगी; काही विद्यार्थी संघटनांचा विरोध
पुणे: शिवजयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आज संध्याकाळी खासदार व अभिनेते अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे, मात्र या कार्यक्रमाला काही विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविल्यामुळे विद्यापीठ परिसरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थी संघटनांनी कुलगुरूंना सह्यांसह निवेदन देत या व्याख्यानाला राजकीय स्वरूप येण्याची शक्यता असल्याचा आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या मते, शैक्षणिक परिसरात राजकीय कार्यक्रमांना परवानगी देऊ नये.
दुसरीकडे, काही विद्यार्थ्यांनी कोल्हे यांच्या समर्थनार्थ कुलगुरूंना पत्र लिहिले असून शिवजयंतीनिमित्त इतिहासावर आधारित व्याख्यान घेण्यास विरोध करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे.
यावर प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, काही विद्यार्थी संघटनांनी माझ्या व्याख्यानाला विरोध केला आहे. मात्र विद्यापीठाकडून मला अधिकृत माहिती मिळालेली नाही. आज सायंकाळी चार वाजता होणाऱ्या व्याख्यानाला मी उपस्थित राहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती देणे हे माझे कर्तव्य आहे. राजकारण बाजूला ठेवून मी अशा कार्यक्रमांना जातो. या प्रकरणामुळे पुणे शहरात शिवजयंती कार्यक्रमांदरम्यान नव्या वादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. कार्यक्रम शांततेत पार पडतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.