Rahul Gandhi: सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींना हजर राहण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 17:17 IST2024-10-05T17:17:39+5:302024-10-05T17:17:50+5:30
सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला

Rahul Gandhi: सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य; राहुल गांधींना हजर राहण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
पुणे: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले असून, २३ ऑक्टोबरला स्वतः किंवा वकिलामार्फत न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या दाव्याची सुनावणी आता आजी-माजी खासदार-आमदारांविरोधात खटले चालविणाऱ्या विशेष न्यायालयात होणार आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल शिंदे यांच्या या विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचे समन्स बजावले आहे.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकरांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्याचा दाखला देत सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात धाव घेतली हे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल सादर केला असून, त्यात राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकरांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या न्यायालयाने राहुल गांधी यांना हजर होण्याचा आदेश दिला होता. आता हे प्रकरण आजी-माजी खासदार-आमदारांविरोधातील दाव्यांची सुनावणी घेणाऱ्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आले आहे.