'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 12:36 IST2025-07-21T12:36:29+5:302025-07-21T12:36:38+5:30
आषाढी वारी करून हजारो वैष्णवांच्या साक्षीने १७ वर्षांनंतर तुकाराम महाराजांची पालखी आळंदीत आली

'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा
आळंदी: टाळ - मृदंगाचा निनाद...."माऊली - तुकारामांचा अखंड जयघोष... विविध वाद्यांचा गजर.... रांगोळीच्या पायघड्या आणि फटाक्यांची आतषबाजी अशा चैतन्यपूर्ण वातावरणात जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (दि. २०) रात्री दहाच्या सुमारास आळंदीत दाखल झाला. सोमवारी सकाळी पहाट पूजेनंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका माऊलींच्या संजीवन समाधीसमोर ठेवून दोन्ही संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा पार पडला. त्यानंतर सकाळी साडेसातच्या सुमारास तुकोबारायांचा पालखी सोहळा देहूकडे मार्गस्थ झाला.
'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा#ashadhiwari#santdnyaneshwarmaharaj#santtukarammaharaj#alandipic.twitter.com/J0QXZeDDMk
— Lokmat (@lokmat) July 21, 2025
दरम्यान हजारो वैष्णवांच्या साक्षीने १७ वर्षांनंतर तुकाराम महाराजांची पालखी अलंकापुरीत आली. चाकण चौकात पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. तुकोबारायांच्या रथावर फुलांची उधळण करण्यात आली. तर फटाक्यांची शहरात आतषबाजी झाली. रात्री साडे दहाच्या सुमारास मंदिर प्रदक्षिणा व आरती घेण्यात आली. माऊलींच्या कारंजा मंडपात पालखी मुक्कामासाठी ठेवण्यात आली. आज (दि. २१) सकाळी विधिवत महापुजेनंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका 'श्रीं'च्या गाभाऱ्यात दर्शनासाठी नेण्यात आल्या. भेटीच्या अनुपम सोहळ्यानंतर 'ज्ञानोबा - माऊली तुकारामांच्या' जयघोषात नगरपालिका चौक मार्गे पालखी देहूकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली. हजारो वारकऱ्यांनी तसेच आळंदीकरांनी तुकोबारायांच्या पालखीला जड अंतकरणाने निरोप दिला.