पुणे: साहिल हा गरिबीशी झुंज देऊन स्वतःची ‘थार’ घेणारा आणि पुण्यात ३-४ ठिकाणी ‘मोमोज’चा व्यवसाय उभा करणारा मेहनती तरुण म्हणून परिसरात ओळखला जायचा. आपल्या जिवलग मित्रांना घेऊन तो पहिल्यांदाच कोकण फिरायला निघाला होता. दुसऱ्या दिवशी संपर्क तुटल्यावर साहिलचा मोठा भाऊ आणि गावकरी घाटात शोध घेत होते; पण गाडी इतकी खोल कोसळली होती की, डोळ्यांना दिसलीच नाही. अखेर ड्रोनने ती सापडली आणि सहा कुटुंबांवर आभाळ कोसळले. कोपरे गाव, उत्तमनगर परिसरात प्रचंड शोककळा पसरली.
कोकण फिरायला निघालेल्या कोपरे गावातील सहा जिवलग मित्रांचा प्रवास काळ बनला. सोमवारी (ता.१७) रात्री ११:३० वाजता थार गाडीने (क्र. एमएच-१२, वायएन- ८००४) घर सोडलेले हे सहा तरुण ताम्हिणी घाटातील खोल दरीत कोसळले. चार दिवस कुटुंबीयांचे डोळे रस्त्याकडे लागले होते. अखेर गुरुवारी दुपारी ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने गाडी आणि सहाही निर्जीव देह बाहेर काढण्यात आले.
पुण्यातील उत्तमनगर आणि भैरवनाथनगर परिसरातील सहा तरुण सोमवारी रात्री ११:३०च्या सुमारास थार कारने (क्र. एमएच १२ वायएन ८००४ ) कोकणाकडे निघाले हाेते. मंगळवारी सकाळी एकाही तरुणाने पालकांशी संपर्क केला नाही. त्यानंतर पालकांनी तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो झाला नाही. त्यानंतर घाबरलेल्या पालकांनी उत्तमनगर पोलिसांकडे धाव घेत सहा तरुण बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी सीसीटीव्ही आणि मोबाइल लोकेशन तपासून ताम्हिणी घाट परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. पुणे व माणगाव पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकांनी शोध घेतला. मात्र, हाती काहीच लागत नव्हते. अखेर गुरुवारी ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार बचाव पथकांनी शोध कार्य सुरू केले. अखेर ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीतील कोंडेथर गावानंतर घाट उतरताना येणाऱ्या पहिल्या अवघड वळणावरील खोल दरीत थार आढळून आली.
सहा तरुण
१. साहील साधू गोटे (वय- २४, धंदा-व्यवसाय- मोमोज गाडी मालक, शिक्षण- १२ वी, रा. कोपरे गाव, पुणे.)
२. ओंकार सुनील कोळी (१८, धंदा- काही नाही, शिक्षण-१२ वी, रा. कोपरे गाव, पुणे.)३. शिवा अरुण माने (१९, धंदा- मजुरी- मोमोजच्या गाडीवर, रा. कोपरे गाव, पुणे.)
४. श्री महादेव कोळी (१८, धंदा- मजुरी- मोमोजच्या गाडीवर, भैरवनाथनगर)५. प्रथम शहाजी चव्हाण (२२, धंदा- भारती विद्यापीठ हॉस्पिटल येथे वॉर्डबॉय, रा. भैरवनाथनगर, पुणे.)
६. पुनित सुधाकर शेट्टी (वय- २०, धंदा- मजुरी- मोमोज गाडीवर, कोपरेगाव.)
Web Summary : Six friends from Kopre village died after their car plunged into a deep valley in Tamhini Ghat. They were on their way to Konkan. The car was found using a drone after a four-day search. The youths were identified as owners and employees of a Momos stall.
Web Summary : कोपरे गांव के छह दोस्त कोंकण जा रहे थे, तभी ताम्हिणी घाट में उनकी कार गहरी खाई में गिर गई। चार दिन बाद ड्रोन से कार मिली। सभी की मौत हो गई। मृतकों की पहचान मोमोज स्टॉल के मालिक और कर्मचारियों के रूप में हुई है।