जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 11:55 IST2025-10-02T11:55:33+5:302025-10-02T11:55:53+5:30
इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या; डिश वॉशर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन खरेदीकडे कल

जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त
पुणे : यंदाच्या वर्षी इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी होत आहे. यामुळे इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठा ग्राहकांनी गजबजल्या आहेत. दसरा सणाच्या मुहूर्तावर नवीन वस्तूंची खरेदी करण्याची प्रथा असल्याने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. घरगुती उपकरणांसह, डिश वॉशर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तू खरेदी करण्याला नागरिकांनी प्राधान्य दिले.
घरात एखादी नवी वस्तू खरेदीचे नियोजन कुटुंबांकडून आधीच केले जाते. मात्र प्रत्यक्ष खरेदीसाठी एखादा चांगला दिवस बघून नवीन वस्तू घरी आणण्याची प्रथा आहे. त्यामुळे नवीन वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधला असल्याचे बाजारात दिसत आहे. बाजारपेठेत सकाळपासूनच नागरिकांची पावले खरेदीसाठी वळू लागली होती. लक्ष्मी रस्त्यासह, टिळक रस्ता, कुमठेकर परिसरात सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ सुरू होती. दुपारनंतर ही गर्दी आणखी वाढली. विविध दुकानदारांनी दसऱ्यानिमित्त खास सवलतींची योजना आणल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी ‘बाय वन गेट वन’, ‘नो कॉस्ट ईएमआय’, ‘कॅशबॅक’ अशा आकर्षक ऑफर दिल्या जात होत्या.
काही दुकानदारांच्या मते, मागील काही महिन्यांच्या तुलनेत दसऱ्यापासून खरेदीला सुरुवात झाली आहे. सध्या सणासुदीमुळे बाजाराला चांगला उभारी मिळाली आहे. सणासुदीचा उत्साह, डिजिटल उपकरणांवरील वाढती अवलंबित्व आणि सवलतींचे आकर्षण यामुळे यंदा दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत खरेदीचा जोर अधिकच वाढलेला दिसून आला. यातच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जीएसटीचे दर अधिक असल्यामुळे बहुतांश ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी हात आखडता घ्यावा लागत होता. मात्र, यंदा नागरिकांना मनाजोगी वस्तू खरेदी करता येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदीसाठी बाहेर पडल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीमध्येहीदेखील नागरिकांचा हा उत्साह कायम राहणार आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरील जीएसटी दर कमी झाल्यामुळे यंदा दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांचा कल घरगुती उपकरणांकडे वाढलेला आहे. विशेषतः डिश वॉशर आणि वॉशिंग मशीन यांना मोठी मागणी आहे. त्याचबरोबर ५५ इंचांपेक्षा मोठ्या आकाराच्या टीव्हींनाही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वाढत्या मागणीमुळे अनेक मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. - प्रीतम भालघट, इलेक्ट्रॉनिक व्यावसायिक