प्रियकराच्या खुनाचा कट उघड;सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ अन् भावजयीसह केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 12:37 IST2025-10-09T12:35:38+5:302025-10-09T12:37:28+5:30
प्रियकराचा खून करणाऱ्या प्रेयसीसह तिघांना अटक;पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ४८ तासांत छत्रपती संभाजीनगर येथून संशयितांना केले जेरबंद

प्रियकराच्या खुनाचा कट उघड;सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ अन् भावजयीसह केली हत्या
पिंपरी : प्रियकर सतत भांडण करतो म्हणून प्रेयसीने भाऊ आणि होणाऱ्या भावजयीच्या मदतीने प्रियकराचा खून केला. त्यानंतर मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळून निर्जनस्थळी फेकून दिला. चाकण एमआयडीसीत झालेल्या खूनप्रकरणी पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी ४८ तासांत प्रेयसीसह तिघांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली.
मुकेश कुमार (वय २४) असे खून झालेल्याचे नाव आहे, तर आरतीकुमारी बिजलाऊराम उराव (२३), आकाश बिजलाऊराम उराव (२१), बालमुनी कुमारी रामचंद्र उराव (२१, तिघेही रा. झारखंड) यांना अटक केली आहे. आरतीकुमारी आणि मुकेश यांचे मागील तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे एकत्रित राहत होते. दरम्यान, महिनाभरापूर्वी ते चाकण एमआयडीसीत कडाचीवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहण्यास आले. मुकेश आरतीकुमारीला सतत मारहाण करत असे.
या त्रासाला कंटाळून तिने भाऊ आकाश आणि त्याची होणारी पत्नी बालमुनी कुमारी यांना बोलावून घेतले. दि. २ ऑक्टोबरला रात्री आरतीकुमारी आणि मुकेशकुमार यांनी दारू पिल्यानंतर पुन्हा वाद झाला. यातून तिघांनी रात्री अकराच्या सुमारास मुकेशला बेदम मारहाण केली. नंतर त्यांनी खोलीतील फरशी पुसली. पहाटे तीनच्या सुमारास मुकेशला ब्लँकेटमध्ये गुंडाळून खोलीजवळील निर्जनस्थळी टाकले. तेथे पुन्हा त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर विटा आणि दगडाने मारून खून केला. मृतदेहावर गवत टाकून तिघेही खोलीवर आले. त्यानंतर खोली सोडून निघून गेले.
दरम्यान, ४ ऑक्टोबररोजी कडाचीवाडी येथे निर्जनस्थळी मृतदेह आढळून आला. तो कुजण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गुन्हे शाखा युनिट तीनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील जावळे, राजाराम लोणकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनयन बाळसराफ, योगेश्वर कोळेकर, राम मेरगळ, शेखर खराडे, योगेश आढारी, समीर काळे यांनी परिसरात मृतदेहाचे फोटो दाखवून तपास सुरू केला. कडाचीवाडी येथे राहणारे काहीजण खोली सोडून निघून गेल्याचे समजले. त्यानुसार खोलीच्या मालकाकडे चौकशी करून फोन नंबर मिळवून तांत्रिक विश्लेषण केले. संशयित छत्रपती संभाजीनगर येथे असल्याचे समजले.
पथकाने छत्रपती संभाजीनगर येथे एमआयडीसीतील पाच किलोमीटर परिसरात १७ तास शोध घेतला. तेथील खोलीत तिघे संशयित होते. त्यांना अटक करून पोलिसी खाक्या दाखवला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.