काँग्रेसचा तब्बल २८ वर्षांनी कसब्यात विजय; लोकसभेला पुन्हा तोच उमेदवार; पुण्याचा आखाडा गाजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 10:28 AM2024-03-22T10:28:01+5:302024-03-22T10:28:31+5:30

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी हेही इच्छुक असताना धंगेकर-मोहोळ लढत जास्त चांगली व विजयासाठी उपयोगी ठरेल, काँगेसच्या केंद्रीय कमिटीचे मत

Congress victory in kasba vidhansabha after 28 years Same candidate for Lok Sabha again The arena of Pune will be resounding | काँग्रेसचा तब्बल २८ वर्षांनी कसब्यात विजय; लोकसभेला पुन्हा तोच उमेदवार; पुण्याचा आखाडा गाजणार

काँग्रेसचा तब्बल २८ वर्षांनी कसब्यात विजय; लोकसभेला पुन्हा तोच उमेदवार; पुण्याचा आखाडा गाजणार

पुणे : काँग्रेसच्या दिल्लीतून प्रसिद्ध झालेल्या यादीत अखेर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांनाच उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले. पुणे शहर लोकसभा मतदारसंघात आता महायुतीचे मुरलीधर मोहोळ विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात सामना होईल. मोहोळ यांच्यासमवेत कोरोना काळात त्यांनी महापौर म्हणून केलेल्या कामाचे वलय आहे, तर धंगेकर यांच्याबरोबर कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला विजय मिळवून देताना दाखविलेला करिष्मा आहे.

काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या देशातील ५७ लोकसभा उमेदवारांच्या पहिल्याच यादीत धंगेकर यांचे नाव जाहीर झाले. इथून उमेदवारी करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी हेही इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांनी जोशी-मोहोळ लढतीपेक्षा धंगेकर-मोहोळ लढत जास्त चांगली व विजयासाठी उपयोगी ठरेल, असे मत व्यक्त केले आणि धंगेकर यांची उमेदवारी तिथेच नक्की झाली.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ होता; मात्र संघटनेच्या बळावर मागील काही वर्षात भारतीय जनता पक्षाने आक्रमकपणे काँग्रेसचा शिक्का पुसट केला आणि त्यावर कमळाची मोहोर ठळक केली. सन २०१४ व त्यानंतर सन २०१९ अशा सलग दोन वेळा भाजपने या मतदारसंघावर काही लाखांच्या फरकाने विजय मिळविला. काँग्रेसच्या काकासाहेब गाडगीळ, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी यांनी वारंवार मिळविलेल्या या मतदारसंघावर त्याही आधी भाजपच्या अण्णा जोशी, प्रदीप रावत यांनी भाजपचे नाव कोरले होतेच.

काँग्रेससाठी आताची लोकसभा निवडणूक म्हणजे हा मतदारसंघ पुन्हा खेचून आणण्याची संधी आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी वर्षभरापूर्वीच भाजपचा पराभव केला होता. सलग २८ वर्षे त्यांच्याकडे असलेला हा मतदारसंघ धंगेकर यांच्या मागे ताकद एकटवून काँग्रेसने मिळविला आहे. तीच जादू पुन्हा चालविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला, तर सोपी वाटणारी ही निवडणूक भाजपसाठी निकराची ठरण्याची दाट शक्यता आहे.

महायुतीमध्ये आता भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) व शिवसेना (एकनाथ शिंदे) हे दोन प्रमुख पक्ष आहेत. शिवाय त्यांचे नेहमीचे मित्र पक्ष असलेले आरपीआय व अन्य घटक पक्षही आहेत. काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन प्रमुख पक्ष आणि त्यांचे अन्य मित्र पक्ष आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत नेमकी हीच नेपथ्यरचना होती. त्यावरच विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रयोग झाला व त्यात काँग्रेसने बाजी मारली. आता राष्ट्रवादीची फूट वगळता त्याच नेपथ्यरचनेत लोकसभा निवडणुकीचा प्रयोग होत आहे. त्यात कोणी बाजी मारणार याचा अंदाज प्रचाराच्या रांगरंगावरून करावा लागणार आहे.

Web Title: Congress victory in kasba vidhansabha after 28 years Same candidate for Lok Sabha again The arena of Pune will be resounding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.