शहर काँग्रेसने केली अजित पवार यांची कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 00:00 IST2019-03-30T23:59:46+5:302019-03-31T00:00:20+5:30
चिंचवडमध्ये मनोमिलन बैठक : कॉँग्रेसला हवा विधानसभेत वाटा

शहर काँग्रेसने केली अजित पवार यांची कोंडी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आतापर्यंत राष्ट्रवादीने काँग्रेसची मदत घेतली. आता लोकसभेला आमची मदत हवी असेल, तर शहरातील विधानसभा मतदारसंघात काँग्रेसलाही सन्मानपूर्वक वाटा मिळाला पाहिजे, अशी मागणी करीत शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोंडी केली.
मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मनोमिलनासाठी अजित पवार व शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या उपस्थित आॅटो क्लस्टर येथे शुक्रवारी रात्री बैठक झाली. या वेळी काँग्रेसचे माजी महापौर कविचंद भाट, माजी प्रदेश महिलाध्यक्ष श्यामला सोनवणे, सेवा दलाचे संग्राम तावडे, महिलाध्यक्षा गिरिजा कुदळे, युवकचे मयूर जैसवाल, माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते. शहरात राष्ट्रवादीने विविध निवडणुकांच्या काळात केवळ काँग्रेसचा उपयोग केला. परंतु, काँग्रेसच्या मदतीवेळी बेबनाव करण्यात आल्याचा पाढा कार्यकर्त्यांनी वाचून दाखविला. महापालिका निवडणुकीत आघाडी केली असती, तर दोन्ही पक्षांच्या जागेत वाढ झाली असते. ‘जिओ और जीने दो’चा आघाडी धर्म दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पाळला पाहिजे. आम्ही लोकसभेला मदत करतो, पण तुम्ही विधानसभा निवडणुकीत आम्हाला आमचा वाटा दिला पाहिजे, असे साठे यांनी सांगितले.त्यावर अजित पवार यांनीही यापुढे एकत्र काम करणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना दिले.