काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 14:30 IST2021-04-29T14:29:59+5:302021-04-29T14:30:31+5:30
आवश्यकता भासल्यास मुंबईला हलविणार....

काँग्रेस खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर; राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची माहिती
पुणे: काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना १९ एप्रिलला कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली होती. २२ तारखेला त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यांना २५ तारखेला जहांगिर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासन आणि राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे.
राज्यमंत्री व काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी गुरूवारी(दि.२९) दुपारी सातव यांच्या तब्येतीची जहांगिरमध्ये जाऊन विचारपूस केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून त्यांंनी माहिती घेतली. यानंतर कदम पत्रकार परिषदेत बोलत होते.
कदम म्हणाले, खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांना २५ तारखेला जहांगिरमध्ये दाखल करण्यात आले. तब्येत बिघडल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात
आवश्यकतेनुसार सर्व उपचार सुरू आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा करण्यासाठी जहांगीरमधील डॉक्टरांचे प्रयत्न सुरू आहेत. मला खात्री आहे ते लवकर बरे होतील. कुटुंबातील सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत.याप्रसंगी सर्वांच्या प्रार्थनाच कामाला येणार आहे असेही विश्वजीत कदम म्हणाले.
आवश्यकता असल्यास मुंबईला हलवणार...
सध्या तरी जहाँगिर रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली राजीव सातव यांच्यावर उपचार सुरू आहे.मात्र,आवश्यकता असल्यास राजीव सातव यांना मुंबईला हलविण्यात येईल असेही कदम यांनी सांगितले.