पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 15:02 IST2024-01-14T12:33:01+5:302024-01-14T15:02:44+5:30
रवींद्र धंगेकर दिल्ली दौऱ्यावर गेले असून काँग्रेस मुख्यालयात भेट घेऊन खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली

पुणे लोकसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक
पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. जागा वाटपासंदर्भात पक्षांनी चर्चा सुरू केल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाने दावा सांगितल्याच्या चर्चा सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी दिल्ली दौऱ्यादरम्यान वरिष्ठ नेत्यांकडे याबाबतची इच्छा व्यक्त केली. दिल्लीत शुक्रवारी (दि. १२) लोकसभा समन्वयकांची बैठक पार पडली. यासाठी रवींद्र धंगेकर दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यांनी काँग्रेस मुख्यालयात भेट घेऊन खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दिल्लीत भेट घेतल्याने रवींद्र धंगेकर लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागणार आहेत, लवकरच त्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते देखील पुण्यात येणार असल्याची चर्चा आहे.