बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 15:34 IST2025-04-18T15:34:02+5:302025-04-18T15:34:53+5:30
खडकवासला कालव्याच्या पाण्यावरून कळसला संघर्ष; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव
कळस : इंदापूर तालुक्यात खडकवासला कालव्याच्या पाण्यावरून संघर्ष उफाळून आला आहे. उन्हाळी हंगामात तीन आवर्तन आवश्यक असताना केवळ दोनच आवर्तने दिली जातात; मात्र यामध्येही पहिल्या आवर्तनात कालव्याचे पाणी टेलला पोचले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
इंदापूर तालुक्यात आवर्तन काळात वीज बंद केली तर शेतकऱ्यांचे पाइप फोडले. वितरिकांना पाणी सोडण्याचे टाळण्यात आले. काही तासांसाठी केवळ दाखविण्यापुरते पाणी सोडण्यात आले. तालुक्यातील खडकवासला कालव्यावरील सिंचन व्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कालव्याच्या पाण्यापासून डावलण्यात आल्याचा आरोप कळस (ता. इंदापूर) येथील शेतकऱ्यांनी खडकवासला पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता पंकज हुलसुरे यांच्याकडे केला.
सध्याची पाण्याची गरज ओळखून तातडीने इंदापूरसाठी आवर्तन सुरू करण्याची आग्रही मागणी यावेळी उपस्थितांनी केली. कळस येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात अभियंता पंकज हुलसुरे, शाखा अभियंता श्यामराव भोसले यांनी ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी खडकवासला कालवा व वितरिकांच्या आवर्तनाबाबत तक्रारींचा पाढाच वाचला. येथील मुख्य कालवा, त्यावरील ४८, ४९ व ५० क्रमांकाच्या वितरिकेतून पाणी सोडण्यात होणारा दुजाभाव, वितरिकांची दुरवस्था यासह अन्य काही समस्या मांडण्यात आल्या.
इंदापूरकरांच्या वाटणीचे पाणी कमी का झाले? असा सवाल उपस्थितांनी केला. आवर्तन काळात शेतकऱ्यांची वीज बंद केली जाते. कालव्यात आलेले पाणी उपसण्यावर निर्बंध घातले जातात. शेतकऱ्यांचे पाइप फोडले जातात. वितरिकांना केवळ दाखविण्यापुरते तास-दोन तास पाणी सोडले जाते. यासाठी खासगी यंत्रणेची मदत घेतली जाते. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होतो. वितरिकांना पाणी येत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. अशा अनेक समस्या उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी मांडत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
बारामती, दौंड, हवेली तालुक्यात पाणी; मात्र इंदापूरला भेदभाव
इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना खडकवासला कालव्याच्या पाण्यापासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा थेट आरोप उपस्थितांनी केला. यावर तातडीने सुधारणा न झाल्यास सिंचन भवन येथे सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी बैठकीत दिला. यावेळी इंदापूर तालुक्याचा सिंचन कालावधी कमी करण्यात आल्याने, पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत. वितरिकांच्या दुरुस्तीसाठी ५२ कोटी रुपये खर्चाची दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. यानंतर वितरण व्यवस्था सुधारण्यास मदत होईल, असे स्पष्टीकरण उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.
तलाव भरण्याचे टाळले
क्रीडामंत्री दत्तात्रेय भरणे यांची भेट घेऊन ग्रामस्थांनी कैफियत मांडली. यावेळी मंत्री भरणे यांनी व्हिडीओ काॅलद्वारे सदर तलाव भरण्याची सूचना करत वितरिकांना तीन दिवस आवर्तन देण्याची सूचना केली. मात्र, मंत्र्यांच्या सूचनेनंतरही तलाव भरण्याचे टाळले.