पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करा; जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणेला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 10:19 IST2020-10-15T10:19:14+5:302020-10-15T10:19:53+5:30
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे.

पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचे तात्काळ पंचनामे करा; जिल्हाधिकाऱ्यांचे यंत्रणेला आदेश
पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी दुपार पासूनच धुवाधार पावसाला सुरुवात झाली. रात्री पावसाचा जोर प्रचंड वाढल्याने शहरांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची दाणादाण उडाली. तर ग्रामीण भागात अनेक तालुक्यात हाताशी अलेले खरिपाची पीक पाण्यात गेले आहे. यामुळेच सर्व संबंधित यंत्रणेने तातडीने अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे ग्रामीण बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. तसेच शहरी भागामध्ये घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देशमुख यांनी दिले. संबंधित तालुकयाचे तहसिलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे पंचनामे करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा प्रशासनाकडून आपदग्रस्तांना तातडीने करावयाची मदत देण्यात येत आहे.महानगरपालिका तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत देखील पूरग्रस्तांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. याविषयी तात्काळ कार्यवाही करून प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासकीय यंत्रणांना दिले. जिल्हयात झालेल्या अतिवृष्टी व पुरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत व त्यांच्या पुनर्वसनाबाबत तसेच ग्रामीण भागातील पिकांचे पंचनामे करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या.
-------
नागरिकांनी येथे संपर्क करावा
शहर, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. नुकसानीबाबत काही शंका असल्यास टोल फ्री नंबर 1077 आणि पुणे येथील आपत्ती नियंत्रण कक्षाचा क्रमांक 02026123371 येथे संपर्क करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.