पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 15:32 IST2025-08-10T15:30:23+5:302025-08-10T15:32:34+5:30

सर्व मिसिंग लिंकची लांबी १२ किलोमीटर असून या लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार

Compulsory land acquisition for 30 missing links in Pune city; Rs 1,000 crore required | पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत

पुणे शहरातील ३० मिसिंग लिंकसाठी सक्तीचे भूसंपादन; एक हजार कोटी हवेत

हिरा सरवदे 

पुणे: शहरातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध रस्त्यांच्या मिसिंग लिंकपैकी ३० मिसिंग लिंकचे भूसंपादन सक्तीने करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या सर्व मिसिंग लिंकची लांबी १२ किलोमीटर असून या लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महापालिकेकडून शहरातील वाहतुकीसाठी विविध उड्डाणपूल, ग्रेड सेफरेटर आणि लहान-मोठ्या लांबीचे आणि रुंदीचे रस्ते विकसित केले जातात. मात्र, शहरीकरणाचा वेग आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे या प्रकल्पांची व रस्त्याची संख्या कायमच तोकडी पडते. यामुळे शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. यावर उपाय म्हणून महापालिकेच्या अंदाजपत्रकात दरवर्षी नवीन रस्ते आणि वाहतुकीच्या प्रकल्पांचे नियोजन करून निधीची तरतूद केली जाते.

दरम्यान, शहराच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा घटक असलेल्या रस्त्यांचा महापालिका प्रशासनाने ऑगस्ट २०२२ मध्ये एमआयटी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मदतीने अभ्यास केला. महापालिका हद्दीमध्ये समावेश झालेल्या गावांचा डीपी (विकास आराखडा) आणि आरपी (प्रादेशिक विकास आराखडा) डोळ्यासमोर ठेवून प्रत्यक्ष जागेवर जाऊन रस्त्यांची पाहणी केली. या पाहणीमध्ये शहर व समाविष्ट गावांमध्ये जवळपास ७०० ठिकाणी (मिसिंग लिंक) भूसंपादन व इतर कारणांमुळे रस्ते रखडल्याचे समोर आले. यामुळे तब्बल ५२० कि. मी. लांबीचे रस्ते तुकड्या तुकड्यामध्ये झाल्याने त्यांचा वापर होत नाही. या मिसिंग लिंकची लांबी २५ ते ३० मीटरपासून दोन कि.मी. पर्यंत आहे. या मिसिंग लिंक जोडल्यानंतर किमान ५०० किमी लांबीचे रस्ते वापरासाठी उपलब्ध होणार आहेत.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने मिसिंग लिंक जोडण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार केला असून महत्त्वाच्या व वाहतुकीवर परिणाम करणाऱ्या लिंक जोडण्यास प्रशासनाकडून प्राधान्य दिले जात आहे. सामंजस्याने भूसंपादन करण्यास प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेच्या पथ विभागाने ३० मिसिंग लिंकचे भूसंपादन सक्तीने करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व ३० मिसिंग लिंकची लांबी १२ कि. मी. असून या लिंक जोडल्यानंतर ६० किलोमीटर लांबीचे रस्ते वापरात येणार आहेत. यापैकी पाच मिसिंग लिंकची जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. आता २५ मिसिंग लिंकचे सक्तीचे भूसंपादन करण्याचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी जवळपास १ हजार कोटीचा निधी लागणार असल्याने निधीच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.

म्हणून रस्ते रखडतात...

वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेकडून नवीन रस्ते तयार केले जातात. रस्त्यासाठी जागा ताब्यात घेण्यासाठी जागा किंवा घर मालकांना ‘टीडीआर’ आणि ‘एफएसआय’च्या माध्यमातून मोबदला दिला जातो. यासाठी प्रशासनाला एक प्रक्रिया राबवावी लागते. यामध्ये वेळ जातो. शिवाय जागामालकांकडून ‘टीडीआर’ आणि ‘एफएसआय’ नाकारून रेडीरेकनरच्या तीन पट दराने रोख मोबदल्याची मागणी केली जाते. त्यामुळे भूसंपादन होत नाही. परिणामी रस्त्यांची स्थिती अर्धवटच राहते.

या मिसिंग लिंकचे होणार सक्तीचे भूसंपादन

कोथरूड कर्वेनगर, वारजे 

१) डॉ. आंबेडकर चौक ते राजाराम ब्रिज - (जावळकर उद्यान परिसरातील मिळकतींना नोटीस दिल्या आहेत)
२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रोजरी स्कूल अंडरपास (निरंजन प्रेस्टीजजवळ, तोडकर अपार्टमेंटजवळ व इंद्रनगरी सोसायटीजवळ)
३) शीला विहार ते भीमनगर, कोथरूड
४) मिलन सोसायटी ते कर्वे पुतळा
५) रजपूत झोपडपट्टी ते म्हात्रे बीज (नदीपात्रातील रस्ता)

बाणेर, पाषाण 

१) बाणेर पॅनकार्ड क्लब ते ननवरे अंडरपास
२) बाणेर ते पाषाण लिंक रोड
३) गणराज चौक ते कस्पटे वस्ती
४) नगरस रोड औंध ते बालेवाडी स्टेडियम
५) सुतारवाडी ते सुस वाकेश्वर चौक
६) सुस उड्डाणपूल सर्व्हिस रोड
७) पाषाण सर्कल ते सोमेश्वर चौक

नगर रोड, विमानतळ, खराडी 

१) गुंजन चौक ते कल्याणीनगर (एचएसबीसी)
२) कल्याणीनगर ते खराडी (नदीकाठचा रस्ता)
३) ५०९ चौक ते धानोरी रोड
४) विमानतळ रोड - पेट्रोल साठा ते शुभ चौक

मुंढवा, हडपसर 

१) एबीसी चौक ते ताडीगुत्ता
२) किर्लोस्कर पूल ते मगरपट्टा दक्षिण रोड
३) मुंढवा आरओबी ते केशवनगर (मंत्रा)
४) ऑमनोरा ते केशवनगर
५) रेल्वेलाइन ते लोहिया गार्डन, सोलापूर रोड

कोंढवा 

१) व्हीआयटी कॉलेज ते कोंढवा रोड (तालाब कंपनी)
२) कोंढवा फॉरेस्ट ते एनआयबीएम रोड, दोरबजी मॉल

सिंहगड रोड 

१) हुमे पाइप ते प्रयेजा सिटी

सातारा रोड 

१) सीताराम आबाजी बिबवे पथ ते सातारा रोड

या जागा आल्या ताब्यात 

१) एकलव्य कॉलेज ते हायवे
२) सुतारवाडी बस डेपो मिसिंग लिंक
३) चौधरी वस्ती ते फनटाईन रोड
४) हिंगणे चौक ते व्हीजन क्रिकेट अकॅडमी
५) माणिक बाग ते सन सिटी (कर्वेनगरकडे जाणारा रस्ता)

Web Title: Compulsory land acquisition for 30 missing links in Pune city; Rs 1,000 crore required

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.