सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख
By नितीश गोवंडे | Updated: February 12, 2025 18:07 IST2025-02-12T18:06:42+5:302025-02-12T18:07:20+5:30
विविध टास्क, गुंतवणुकीचे आमिष, पार्ट जॉबचे आमिष दाखवून केली फसवणूक

सामान्य नागरिकांना दाखवली आमिषे; पुण्यात ४ घटनांमध्ये सायबर चोरटयांनी लुटले ६० लाख
पुणे : सामान्य नागरिकांना विविध आमिषे दाखवून सायबर चोरट्यांनी गेल्या आठवडाभरात तब्बल ६० लाख २७ हजार १५६ रुपयांची फसवणूक केली आहे. चार विविध घटनांमध्ये चोरट्यांनी ही लूट केली असून, त्या घटनांची नोंद लोणीकंद, कोंढवा आणि काळेपडळ (कोंढवा) पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत, सायबर चोरांनी विविध टास्कचे आमिष दाखवत अतिरिक्त कमाई करता येईल, असा विश्वास लोणीकंद येथील ३९ वर्षीय महिलेला दिला. यानंतर टास्क पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी पैसे पाठवण्यास सांगत ३२ लाख २ हजार ७०० रुपयांची फसवणूक केली.
याप्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड करत आहेत. दुसऱ्या घटनेत कोंढव्यातील ४७ वर्षीय व्यक्तीला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून, गुंतवणूक करण्यासाठी विविध बँक खात्यांवर पैसे घेतले.
त्यानंतर फिर्यादी यांना कोणताही परतावा न देता त्यांची १२ लाख ३४ हजार ४५६ रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रऊफ शेख करत आहेत. तिसऱ्या घटनेत, हांडेवाडी येथील ३६ वर्षीय व्यक्तीला शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये जास्तीचा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत विविध बँक खात्यांवर पैसे ट्रान्सफर करून घेत ११ लाख ७६ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील करीत आहेत. तर चौथ्या घटनेत उंड्री येथील ३८ वर्षीय महिलेला पार्ट टाईम जॉब करून जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरांनी ४ लाख १७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.