मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:09 IST2025-03-20T13:07:35+5:302025-03-20T13:09:20+5:30
लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता

मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप
पुणे : निवडणूक आयोग आता मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी (लिंक) करणार आहे. यातील तांत्रिक गोष्टींची पूर्तता करण्यासाठी पावले उचलत असल्याचे आयोगाने जाहीर केले आहे. त्यावरून काँग्रेसनेमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा पुढे केला असून आयोगाचा निर्णय आमच्या शंकांना, आरोपाला पुष्टी देणाराच आहे असे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत त्याआधी फक्त ५ महिने आधीच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा तब्बल ४० लाख मतदार वाढले. मागील ५ वर्षातही राज्यात इतके मतदार वाढले नव्हते. त्यामुळे या वाढलेल्या मतदारसंख्येविषयी काँग्रेसने संशय व्यक्त केला होता. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संसदेत तर पक्षाने निवडणूक आयोगाला याविषयी खुलासा करण्याची मागणी केली होती. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपले आरोप लावून धरले होते, त्याचबरोबर राज्यातील ३० विधानसभा मतदारसंघांमधील मतदारांची मतदार यादीनिहाय तपासणी करण्यासाठी मोहीम सुरू करण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने मतदार कार्ड व आधार कार्ड एकमेकांशी लिंक करणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत आयोगाला निर्देश दिले होते, मात्र त्यानुसार लवकर कार्यवाही होत नव्हती. आता आयोग याबाबतीत लवकरच तज्ज्ञ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या निर्णयाची अंमलजबजावणी करणार आहे. काँग्रेसने यावरून, आम्ही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीबाबत ज्या शंका व्यक्त केल्या आहेत त्या खऱ्याच असल्याचे यावरून दिसत असल्याचे म्हटले आहे. पक्षाने मतदार याद्यांबाबत संशय व्यक्त केला होता. आता आधार कार्ड जोडणी करून या याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
पक्षाच्या केंद्रीय समितीने म्हटले आहे की, मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या आयोगाच्या प्रत्येक प्रयत्नाला पक्षाची साथ आहे, मात्र आता झालेल्या किंवा वाटत असलेल्या संशयास्पद प्रकारांचे काय?, या प्रश्नाचे उत्तर आयोग देत नाही. आधार व मतदार कार्ड यांची जोडणी करणे याचे स्वागतच आहे, मात्र आयोगाचा हा निर्णय विनाचर्चा करण्यात आला. याबाबत सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर आयोगाने चर्चा करणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले आहे की, लोकशाही राज्यव्यवस्थेत मतदार यादी मूलभूत आहे व निवडणूक प्रक्रियेचे स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे. आयोगाच्या हा मतदार कार्ड व आधार कार्ड जोडणी करण्याचा निर्णय प्रत्यक्षात आल्यानंतर जोडणी झालेली नाही. म्हणून कोणत्याही भारतीय प्रौढ नागरिकाला किंवा मतदानाला पात्र असलेल्या कोणालाही मतदानाचा अधिकार नाकारला जाऊ नये अशी काँग्रेसची भूमिका आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.