महापालिकेचा अजब कारभार;अभ्यासिकेचा वापर गोदामासाठी नागरिकांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 09:15 IST2024-12-17T09:13:27+5:302024-12-17T09:15:02+5:30
३ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली अभ्यासिका

महापालिकेचा अजब कारभार;अभ्यासिकेचा वापर गोदामासाठी नागरिकांचे आंदोलन
धायरी : सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे पुणे महापालिकेने तब्बल तीन कोटी रुपये खर्चून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका उभारली. मात्र, त्याचा वापर अभ्यासिकेसाठी न करता गोदाम म्हणून त्याचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी माजी नगरसेवक हरिदास चरवड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करून महापालिकेचा निषेध व्यक्त केला.
वडगाव बुद्रुक येथे २०२१ साली तत्कालीन आमदार चंद्रकांत पाटील, तत्कालीन महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेचे दिमाखात उद्घाटन केले. मात्र, केवळ विद्युत कनेक्शन देणे बाकी नावाखाली ही अभ्यासिका बंद अवस्थेत आहे. अभ्यासिका सुरू करण्यासाठी माजी नगरसेवक हरिदास चरवड यांनी वेळोवेळी महापालिकेकडे लेखी तसेच तोंडी पाठपुरावा केला. मात्र प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले.
आता तर महापालिकेने नायडू रुग्णालय कोठीतील सर्व साहित्य याठिकाणी आणून त्याचा गोदाम म्हणून वापर सुरू केला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज, सोमवारी हरिदास चरवड, ॲड. रामचंद्र कर्डिले, सचिन कडू, बाळासाहेब भरेकर, रामदास शेळके आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे...
तीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या इमारतीचा वापर अभ्यासिकेसाठी म्हणून करण्याऐवजी त्याचा वापर महापालिका गोदाम म्हणून करत असेल तर ते दुर्दैवी आहे. कोणी मटेरियल ठेवले, काय मटेरियल आहे, याबाबत अधिकाऱ्यांना माहिती देखील नाही. सध्या महापालिकेच्या कोणत्या विभागाच्या ताब्यात ही अभ्यासिकेची इमारत आहे, हेही कोणाला माहीत नाही. अधिकारी एकमेकांच्या विभागावर टोलवाटोलवी करून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत.
गरीब घरातील विद्यार्थी या अभ्यासिकेची माध्यमातून भविष्यातील अधिकारी बनतील. मात्र, महापालिकेचे काही अधिकारी हे पैसेखाऊ आहेत. प्रतिकुल परिस्थितीतून अधिकारी होऊनही आता त्यांना त्याची जाण नाही. अशा बेलगाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. - हरिदास चरवड, माजी नगरसेवक