भरउन्हाळ्यात नागरिक पाण्यापासून वंचित; ६ दिवसांपासून दुरुस्ती सुरू, फुरसुंगी, उरुळी देवाची येथील स्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 15:57 IST2025-03-15T15:56:47+5:302025-03-15T15:57:28+5:30
आधीच पाणी दोन दिवसांनी येत आहे, त्यात वाहिनी फुटल्यामुळे चार दिवसांपासून पाणी आले नाही, नागरिकांचे हाल

भरउन्हाळ्यात नागरिक पाण्यापासून वंचित; ६ दिवसांपासून दुरुस्ती सुरू, फुरसुंगी, उरुळी देवाची येथील स्थिती
फुरसुंगी : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या गावांसाठी असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेयजल योजनेची (एमजीपी) पिण्याची एक्स्प्रेस जलवाहिनी रेसकोर्स येथे सहा दिवसांपूर्वी फुटली होती. सहा दिवस होऊनही अद्याप जलवाहिनीची दुरुस्ती न झाल्याने फुरसुंगी आणि उरुळी देवाच्या नागरिकांना भरउन्हाळ्यात पाण्याची प्रतीक्षा करावी लागत आहे. टँकरनेही पाणी मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. दुरुस्ती करून काँक्रिट टाकण्यात येणार आहे. या वाहिनीला दाब जास्त असल्याने टाकण्यात आलेले काँक्रिट मजबूत व्हायला ८ ते १० तास लागणार आहेत. त्यामुळे आणखी दोन दिवस पाणीपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
फुरसुंगी आणि उरुळी देवाची गावांसाठी स्वतंत्र पाइपलाइनद्वारे पाणी देण्यात येत आहे. यासाठी एमजीपीने ९०० मिमी व्यासाची एक्स्प्रेस पाइपलाइन टाकली आहे. ९ मार्चला ती फुटल्यानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाया गेले होते. स्थानिक नागरिक म्हणाले, आधीच पाणी दोन दिवसांनी येत आहे. त्यात वाहिनी फुटल्यामुळे चार दिवसांपासून पाणी आले नाही. इतर कामे सोडून हडपसर गाडीतळ परिसरात जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे अधिकारी म्हणाले, रेसकोर्स येथून फुरसुंगीला जाणारी जलवाहिनी फुटली नसून, दोन वाहिनींमधला ‘जोड’ निसटल्याने गळती झाली. मात्र तत्काळ पाणीप्रवाह बंद करून काम सुरू केले आहे. मोठ्या यंत्राचा वापर न करता कामगारांद्वारे ब्रेकरद्वारे दिवस-रात्र काम सुरू आहे. आज, शनिवारी (दि. १५) सायंकाळपर्यंत काम पूर्ण होईल.
रेसकोर्स येथे फुरसुंगीसाठी असलेली जलवाहिनीचे जॉइंट निघाल्याने दुरुस्तीचे काम सुरू आहे. शनिवारी (दि. १५) सायंकाळपर्यंत काम पूर्ण होईल. काम करताना तांत्रिक अडचण येत असल्यामुळे उशीर झाला. - महादेव देवकर, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पेयजल योजना
फुरसुंगी उरुळी देवाची नागरिकांना गेले ८ दिवस पाणी नाही. क्रमांक लावून टँकर मिळत नाही. प्रशासनास या परिस्थितीचे गांभीर्य नाही. असे हाल अजून किती दिवस काढायचे याचा खुलासा नगरपरिषदेच्या प्रशासकांनी करावा. या योजनेचे ऑडिट करण्यात यावे. - रणजित रासकर, स्थानिक नागरिक
युद्धपातळीवर काम करण्याबाबत बोलणी चालू असून, टँकरची संख्या वाढवण्यास सांगितली आहे. आज सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. - सचिन पवार, प्रशासक, फुरसुंगी नगरपरिषद