पुण्यात हुडहुडी! जिल्ह्यातही थंडीचा कडाका, तापमान ९.४ तर हवेली ६.९ अंशावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 12:34 IST2025-11-19T12:34:22+5:302025-11-19T12:34:39+5:30
पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे

पुण्यात हुडहुडी! जिल्ह्यातही थंडीचा कडाका, तापमान ९.४ तर हवेली ६.९ अंशावर
पुणे: पुण्यात हुडहुडी जाणवायला लागली असून, शहरात रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटू लागल्या आहेत. मंगळवारी (दि. १८) पुण्याचे किमान तापमान ९.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. जिल्ह्यातही थंडीचा कडाका कायम असून, सर्वात नीचांकी तापमान हवेली येथे ६.९ अंश सेल्सिअस इतके होते. दरम्यान, पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असून किमान तापमानात किंचित वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातही थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तरेकडून पुणे शहराच्या दिशेने येणाऱ्या थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढत आहे. पाषाण ९ अंश सेल्सिअस, बारामती ८.९, पाषाण ९, माळीण ९.२, तळेगाव ९.९, दौड ९.९, आंबेगाव १०.७, कुरवंडे ११.९, भोर १२.१, शिरूर १४, लवळे १४.२, चिंचवड १४.५, वडगावशेरी १५.८, तर गिरिवन येथे १६.५ अंश सेल्सिअस तापमान होते. वाढत्या थंडीमुळे सायंकाळनंतर व्यवहार थंडावले आहेत. नागरिकांनी स्वेटर, कानटोपी, मफलर आदी उबदार कपडे घेण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहून किमान तापमान वाढणार आहे. त्यामुळे किमान तापमानात काहीशी वाढ होण्याचा अंदाज आहे.