मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 11:49 IST2025-01-06T11:47:32+5:302025-01-06T11:49:01+5:30
मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत आहेत, एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला, असा संदेश जाईल

मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडेंना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही; जरांगे पाटलांचा इशारा
पुणे: सरपंच संतोष देशमुख व बुद्धवासी सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी रविवारी पुण्यात सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. जोपर्यंत फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत राज्यात विविध मोर्चे सुरू राहतील, असा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी पुण्यातील आक्रोश मोर्चामध्ये दिला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी या मोर्चात धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना आवरावं, नाहीतर आम्ही थांबणार नाही. आमची लोकं तुला अडकवतील, ज्या मराठ्यांनी वाचवलं, त्यावर तुम्ही पलटला आहात, प्रतिमोर्चे काढले तर आम्ही देखील तसेच उत्तर देऊ, असा इशारा त्यांनी मुंडे यांना इशारा दिला. पुढे जरांगे म्हणाले, संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या केली. राज्य यांना कुठं न्यायचं आहे. या विरोधात राज्यभर आम्ही मराठे मोर्चे काढू. हा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. आता मी थेट मुख्यमंत्र्यांना बोलणार आहे. त्यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे. सरकारमध्ये राहून यांना जातीय तेढ निर्माण करायची आहे. मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर मराठे शांत आहेत. ही लोकं आम्हाला खूप त्रास देत आहेत. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला, असा संदेश जाईल. त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत, मुंडेंनी हे सगळं थांबवावं, असे आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
सर्व आरोपी पुण्यात कसे?
संतोष देशमुख यांचे सर्व मारेकरी पुण्यात कसे सापडले? हे आरोपी बीडमधून थेट पुण्यात का आले? या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील जरांगे यांनी यावेळी केली.
या लोकांना फाशीची शिक्षा द्या
बीडमध्ये संघटित टोळी सुरू आहे. रविवार असल्याने पुण्यातील आमदारांना कदाचित सुट्टी असेल म्हणून ते सहभागी झाले नाहीत. वाल्मीक कराड हा संघटित टोळी तयार करून गुंडगिरी करत आहे. त्याला मंत्री धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद आहे. त्याशिवाय संतोष देशमुख यांची हत्या झालेली नाही. कुणीही असला तरी त्याला फाशीच झाली पाहिजे. ही आमची कायम मागणी आहे. ‘मला अटक करा पुण्यात...’ असे म्हणतात. परंतु आता सर्व आरोपी पुण्यातच होते. पुणे तिथं काय उणं आता काहीच उरलं नाही. कुणामुळे झाले तर या वाल्मीक कराड आणि गँगमुळे. गँग्ज ऑफ परळीमुळे पुण्याचे नाव खराब होत आहे. बीडमधील या टोळ्यांचे जिथे जिथे फ्लॅट असतील, पुणेकरांना विनंती आहे की, दिसेल तर फक्त कळवा. परंतु या लोकांना फाशीची शिक्षा द्या, तोपर्यंत समाज गप्प बसणार नाही असे आमदार सुरेश धस यांनी यावेळी सांगितले आहे.