शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा दुहेरी भुयारी मार्गासाठी मुख्यमंत्री १५ दिवसांत बैठक घेणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:34 IST2025-12-10T19:33:09+5:302025-12-10T19:34:41+5:30
पुणे महानगरपालिका आणि बांधकाम विभाग दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार

शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबाग ते शनिवारवाडा दुहेरी भुयारी मार्गासाठी मुख्यमंत्री १५ दिवसांत बैठक घेणार
पुणे : शहराचा मध्यवर्ती भाग असणाऱ्या पेठांमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. वाहनांची संख्या वाढल्याने सध्या अस्तित्वात असणारे रस्ते अपुरे पडत आहेत. वाहतूक कोंडीवर दूरगामी उपाययोजना करण्यासाठी शनिवारवाडा ते स्वारगेट आणि सारसबागच्या ते शनिवारवाडा दुहेरी भुयारीमार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यास अधिकाऱ्यांकडून विलंब होत असल्याकडे आमदार हेमंत रासने यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून लक्ष वेधले. यावेळी येत्या पंधरा दिवसांमध्ये स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात बैठक घेणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.
हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार हेमंत रासने यांनी भुयारी मार्ग प्रकल्पाच्या डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यात होत असलेल्या विलंबाकडे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या दालनात झालेल्या बैठकीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने महापालिकेला हा प्रकल्प अहवाल तयार करण्यास सांगितले. या दोन्ही विभागांच्या असमन्वयामुळे प्रकल्प आराखडा तयार करण्यास विलंब होत असल्याचे आमदार हेमंत रासने यांनी सांगितले.
"यशदामध्ये शहराच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत भुयारी मार्गांचा प्रकल्प अहवाल महापालिकेला तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र महापालिकेने आपल्याकडे ही यंत्रणा नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तो तयार करण्याचे पत्र दिले. दोन्ही प्रशासनामध्ये संभ्रम असल्याने नक्की काम कोणी करायचे या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुढील पंधरा दिवसांत बैठक घेणार आहेत" अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात दिली.
गणेशोत्सव मंडळांवर दाखल खटले मागे घ्या
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये काही मंडळाकडून ध्वनिक्षेपकांची मर्यादा ओलांडण्यात आल्याने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. मात्र काही मोजक्या मंडळाकडून उल्लंघन झाले असताना अडीचशे ते तीनशे मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गणेश मंडळाचे कार्यकर्ते हे गणेशोत्सवासाठी वर्षभर मेहनत घेत असतात. काही लोकांच्या चुकीची शिक्षा सर्वांना होणे अन्यायकारक आहे. सरकारने कार्यकर्त्यांच्या भावनेचा विचार करत गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी देखील हेमंत रासने यांनी सभागृहात केली.